मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचं बंड कायदेशीर मार्गाने मोडून काढण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये ठाण मांडून बसलेल्या बंडखोर आमदारांमध्ये चलबिचल होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर या बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना धीर देताना मोठं विधान केलं आहे.
चार दिवसांत नवं सरकार स्थापन होईल, आपलं सरकार बनेल, विश्वास ठेवा अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी या बंडखोर आमदारांना दिला आहे. बंडखोर आमदारांचा गट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील उर्वरित शिवसेना यांच्यात कायदेशीर मार्गाने डाव प्रतिडाव टाकले जात असतानाच एकनाथ शिंदे यांच्या या विधानामुळे आता पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज राष्ट्रीय पक्षाच्या बड्या नेत्याला भेटण्याची शक्यता आहे. या भेटीत नवे सरकार स्थापन करण्यासाठीच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा होऊ शकते.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारणाऱ्या आमदारांपैकी १६ आमदारांचं निलंबन करण्याची मागणी शिवसेनेने एका पत्राद्वारे विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. त्यावर आता सोमवारपासून सुनावणी होण्याची शक्यता असून, त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.