मराठा आंदोलन पेटवणा-या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती- चंद्रकांतदादा पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 04:15 PM2018-07-27T16:15:01+5:302018-07-27T16:17:36+5:30
मराठा आंदोलन पेटवणा-या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती आहे.
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडची घटनाही घडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारच्याही मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. आता चंद्रकांतदादा पाटलांनीही एबीपी माझाच्या मुलाखतीत मराठा आंदोलनातील हिंसाचारावर भाष्य केलं आहे. मराठा आंदोलन पेटवणा-या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती आहे. वेळ आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली होती. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मॅरेथॉन चर्चाही झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन सर्व घडामोडींची माहिती दिली.
मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही; पण हे आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार काय काय प्रयत्न करीत आहे हे जनतेसमोर प्रकर्षाने मांडण्याची भूमिका बैठकीत घेण्यात आली. विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी वर्षे सत्ता असताना मराठा समाजाला काहीही मिळाले नाही. आपल्या सरकारने आरक्षण देण्याची भूमिका घेतानाच मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले ते प्रभावीपणे जनतेत जाऊन मांडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.