गॉडफादरपेक्षा आपली मेहनत महत्त्वाची असते

By Admin | Published: April 28, 2015 10:40 PM2015-04-28T22:40:42+5:302015-04-28T22:40:42+5:30

मेहनतीशिवाय यशाचे कुठलेही मार्ग सोपे होत नाहीत, असे मत झी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या ‘असे हे कन्यादान’ या मालिकेतील गायत्रीचा भाऊ तेजस डोंगरे याने व्यक्त केले.

Our hard work is more important than Godfather | गॉडफादरपेक्षा आपली मेहनत महत्त्वाची असते

गॉडफादरपेक्षा आपली मेहनत महत्त्वाची असते

googlenewsNext

कुठल्याही क्षेत्रात गॉडफादर असण्यापेक्षा आपली मेहनत महत्त्वाची आहे. तसेच मेहनतीशिवाय यशाचे कुठलेही मार्ग सोपे होत नाहीत, असे मत झी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या ‘असे हे कन्यादान’ या मालिकेतील गायत्रीचा भाऊ तेजस डोंगरे याने व्यक्त केले. या वेळी सेटवरील अनेक गमतीदार प्रसंगांच्या आठवणींमध्ये तेजस रमला आणि त्याने हास्याचा मनमुराद आनंद लुटला. तो शिक्षणाच्या बाबतीतही तितकाच सतर्क असून तो अ‍ॅडव्हर्टायझिंग या विषयातून एमए करीत आहे. त्याच्या एकांकिका ते सिरीयल आणि अभ्यास अशा सर्वच क्षेत्रातील वाटचालीचे वर्णन खास गप्पांतून लोकमतच्या वाचकांसाठी...

४एकांकिका आणि सिरीयल या तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगशील?
नवनीत पब्लिकेशनच्या अ‍ॅडव्हर्टाइजमध्ये मी पाचवी इयत्तेत असताना काम केले होते. त्यानंतर, जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला आणि महाविद्यालयात सर्वात गाजलेली नाट्यस्पर्धा म्हणजे आयएनटी, यामध्ये मी दरवर्षी महाविद्यालयातर्फे सहभाग घेतला. माझ्या पहिल्या एकांकिकेचे नाव सहावे इंद्रधनुष्य असे होते. त्यानंतर, इतकं सोपं असतं का?, ती गेली तेव्हा, अशा एकांकिकांमधून मला रंगभूमीची ओळख झाली. त्यानंतर, मात्र आॅडिशन देऊन झी मराठीवरच गाजत असलेल्या ‘अस्मिता’, ‘जयस्तुते’, ‘लक्ष’ अशा सिरीयल मी केल्या आणि त्यानंतर माझी ‘असे हे कन्यादान’ या सिरीयलसाठी निवड झाली.
४तुला असे वाटते का, की या क्षेत्रात गॉडफादरची गरज असते आणि तुला तशी गरज भासली का?
नाही, मला असे अजिबात वाटत नाही. कारण, माझी आॅडिशन देऊनच निवड झाली आहे. मेहनतीशिवाय यशाचे कोणतेही मार्ग सहज शक्य नाहीत. गॉडफादर असण्यापेक्षा आपल्याकडे काय गुण आहेत, हे ओळखूनच करिअरची निवड करावी म्हणजे गॉडफादरची गरज भासत नाही.
४ज्यातून तू घडलास, त्या रंगभूमीवर पुन्हा पदार्पण करण्याचे तुझे काही प्लॅन्स आहेत?
नाटक करण्याची मनापासून इच्छा आहे, मात्र शूटिंग आणि अभ्यासाच्या या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळत नसल्याने सध्या येत असलेल्या नाटकाच्या आॅफर मी स्वीकारत नाही.
४तू ‘असे हे कन्यादान’मधील सेटवर चालणाऱ्या गमतीदार आठवणींबद्दल काय सांगशील?
गायत्री देशमुख म्हणजेच सिरीयलमधील माझी आई, ती या व्यक्तिरेखेच्या बाहेर असली तरी ती आमची सेटवरची आईच आहे. आमच्या खाण्याची ती सतत काळजी घेत असते. तिने बनवलेली कॉर्न स्पेशल रेसिपी खाताना खूप धम्माल चालू असते. मधुरा, प्रसाद या सर्वच सहकलाकारांबरोबर छान मैत्री झाली आहे. शरद पोंक्षेकडून तर अनुभवांची शिदोरीच मिळत आहे.
४तुझी गायत्रीचा भाऊ या रोलसाठी जेव्हा निवड झाली, त्या वेळी बारीक व्हायला सांगितले होते, असे मी ऐकले आहे, हे खरे आहे का?
हो, हे अगदी खरे आहे. मी सध्या वेळ मिळेल तसे जिमलाही जातो. यात मी शरद पोंक्षे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. ते कितीही व्यस्त असले तरी रोज सकाळी उठून चालायला जाणे विसरत नाहीत. ते म्हणतात, तब्येत चांगली असेल तर सगळे जग जिंकता येते आणि त्यांचा हा मूलमंत्र मी जपण्याचा प्रयत्न करत आहे.
४नुकत्याच साजऱ्या झालेल्या जागतिक पुस्तक दिवसानिमित्त तरुण पिढी पुस्तक वाचत नसल्याची ओरड होते, त्याबद्दल तुला काय वाटते?
पुस्तकावरून एक किस्सा आठवला. ज्या वेळी आमच्या सिरीयलचा मुहूर्त झाला होता, त्या वेळीच शरद पोंक्षेसरांनी मला वेळ मिळेल तेव्हा पुस्तक वाचायचे, असे सांगितले होते. त्यामुळे आमच्या सेटवर धम्माल मस्तीबरोबरच पुस्तक वाचण्याचेही वेड सर्वांनाच आहे. वेळ मिळेल तेव्हा आम्ही पुस्तक वाचतो. आतापर्यंत सावरकर, पु.ल. यांची पुस्तके मी सेटवर वाचून काढली. वाचन असेल तर आपण विचाराने प्रगल्भ होत असतो.
४ठाणे शहराबद्दल काय सांगशील?
ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि ठाण्यातील माझे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी रंगायतनचा कट्टा. त्या कट्ट्याशिवाय ठाण्यातील कोणतेही सणवार साजरे होत नाहीत, असे मला मनापासून वाटते.
४नवीन तरुणांना या क्षेत्रात यायचे असेल तर काय सुचवशील?
नाटक बघणे, शिबिरांना जाणे, वाचन वाढवणे आणि मेहनत या सर्व गोष्टी करण्याची तयारी असल्यास या क्षेत्रात सहज शिरकाव करता येईल. अभिनय ही अशी गोष्ट आहे, की जी शिकवता येत नाही पण स्वत:ला प्रयत्नपूर्वक शिकता मात्र येते.

Web Title: Our hard work is more important than Godfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.