Join us

...तर आम्ही मातोश्रीवर जाण्यास तयार; एकनाथ शिंदेंही काही बोलणार नाही- संतोष बांगर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 4:40 PM

मातोश्रीवरील आमचं प्रेम अद्यापही कायम आहे, असं आमदार संतोष बांगर म्हणाले.

हिंगली/मुंबई- शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेचे काही बंडखोर आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मातोश्रीवर बोलावलं, तर नक्की जाऊ, असं विधान करत आहेत. शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी देखील आता आम्ही मातोश्रीवर जाण्यास तयार आहे, असं मत व्यक्त केलं आहे. 

संतोष बांगर म्हणाले की, मातोश्रीवरील आमचं प्रेम अद्यापही कायम आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. आजही उद्धव ठाकरेंबाबत आम्हाला आदर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सन्मानपूर्वक मातोश्रीवर बोलवल्यास आम्ही जायला तयार आहे. एकनाथ शिंदे देखील यासाठी नकार देणार नाही, असं संतोष बांगर म्हणाले. आम्ही शिवसेनेतच आहोत, असं संतोष बांगर यांनी सांगितलं. 

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मातोश्रीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि पुन्हा शिवसेना आणि भाजपाची युती झाली, तर प्रत्येक शिवसैनिकाला त्याचा आनंद होईल, अशी भावना संतोष बांगर यांनी यावेळी व्यक्त केली, आम्हाला नोटीसा पाठवल्या आहेत. मात्र चिंता नाही. न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असं संतोष बांगर म्हणाले.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे या निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध शिवसैनिकांसोबत भेटीगाठी घेत संवाद साधत आहे. या यात्रेदरम्यान आज आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ज्यांना परत यायचंय त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट आहेत. ते लवकरच समोर येईल, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. काही बंडखोर आमदारांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहोत. मात्र काही आमदारांना जबरदस्ती नेलं आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, असं आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे. 

दरम्यान, बंडखोरांना मात देण्यासाठी शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला असून यासाठी आदित्य ठाकरे मुंबईतील तब्बल २३६ शाखांमध्ये आणि बंडखोर आमदारांच्या मतदार संघांचा दौरा करणार आहेत. प्रत्येक शाखेत जाऊन ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाहिंगोलीएकनाथ शिंदे