Join us

आमच्या आमदारांचा खूनही होऊ शकतो; अनेकांनी केल्या तक्रारी; संजय राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 4:13 PM

Sanjay Raut : अनेक आमदारांनी तशा तक्रारी आमच्याकडे केली असून अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण झाले आहे, असा खळबळजनक दावा केला आहे.

मुंबई : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन प्रस्ताव दिले आहेत. त्यांनतर मीडियाशी बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या आमदारांचा खून होऊ शकतो. अनेक आमदारांनी तशा तक्रारी आमच्याकडे केली असून अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण झाले आहे, असा खळबळजनक दावा केला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र आहे. अनेक वर्ष आम्ही पक्षात काम केले. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंसोबत त्यांनी काम केले. त्यांचा गैरसमज दूर झाला असेल तर तो दूर केला जाईल. आम्ही त्यांना विनंती केली की मुंबईत या आणि चर्चा करा.  अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण करुन त्यांना सुरतमध्ये नेले आहे. अशा नऊ आमदारांना सुरतमध्ये नेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली आहे. हे असंच सुरु राहिली तर मुंबई पोलिसांना कठोर ऍक्शन घ्यावी लागेल, असा इशारा राऊत दिला आहे. 

एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला, ठाणे पोलिसांना सतर्कतेचा आदेश

सध्या सुरत येथे भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा सुरू आहे. काही वेळाने याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसही पोहचणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :संजय राऊतपोलिसमुंबईआमदारनितीन देशमुख