आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अलीकडे झालीय ती 'नोशनल पार्टी' - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 03:47 PM2023-07-04T15:47:55+5:302023-07-04T15:49:27+5:30

त्या पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले. 

Our NCP party, has recently become a 'notional party' - Jayant Patil | आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अलीकडे झालीय ती 'नोशनल पार्टी' - जयंत पाटील 

आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अलीकडे झालीय ती 'नोशनल पार्टी' - जयंत पाटील 

googlenewsNext

मुंबई : आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आता अलीकडे झालीय ती 'नोशनल पार्टी' आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. तसेच, त्या पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले. 

आज प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पक्षाची भूमिका जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. त्यांनी केलेल्या कृतीचे समर्थन वेगवेगळ्या प्रकारे करणे त्यांना गरजेचे आहे. त्यांनी ते करत राहावे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे, हे सर्वांना माहित आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदेचे बरेच आमदार नाराज आहेत. यांच्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली, तीच कारणे परत आमच्या पुढ्यात आणून ठेवत आहात. याबद्दल प्रचंड असंतोष शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांचा आहे, असे मला समजले आहे. ज्यांच्या जिल्ह्यात विरोध केला, तेच कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे असंतोष हळूहळू पुढे येईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

कुणी काही म्हणो मीच शरद पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. पवारसाहेब जोपर्यंत म्हणत नाहीत, बाजूला हो.. तोपर्यंत बाजूला करण्याचा कुणाला अधिकार नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, ५३ आमदार आमच्याकडे आहेत, त्यापैकी ९ जणांवर आम्ही कारवाई केली आहे. त्यामुळे ५३ वजा ९ हे जे आहेत ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांना वेगळ्या गटात टाकू नये, त्यांना वेगळी प्रलोभने दाखवू नये, त्यांच्यावर दबाव टाकू नये, सगळ्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करु द्यावे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

याचबरोबर, शरद पवारसाहेब आमच्याचबरोबर आहेत आणि आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असे सांगून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. शरद पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सातारा- कराड येथे स्पष्ट केली आहे. ती महाराष्ट्राला समजली आहे, हे स्वयंस्पष्ट आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. 

येत्या काही दिवसात नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर व इतर काही जिल्ह्यात शरद पवारसाहेब स्वतः दौरा सुरू करणार आहेत. हा झंझावात नाशिक जिल्ह्यातून सुरु होईल, त्याअगोदर दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर हा महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. पाऊस असो अथवा नसो पवारसाहेब बाहेर पडणार आहेत. सातारच्या दौऱ्यावर जसे स्वागत झाले त्याचपद्धतीने महाराष्ट्रात स्वागत जनता व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

Web Title: Our NCP party, has recently become a 'notional party' - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.