Join us

'आपलं विमान हवेतच असायचं'; रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना करुन दिली 'जाणीव'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 2:29 PM

शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ज्यांच्यी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे, ज्यांच्या फुटण्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत घेतलेली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ हा अनेकांसाठी धक्का आहे. त्याचसोबत वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या गोटात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, बुधवारच्या भाषणात त्यांनी थेट आपली नाराजी बोलून दाखवत शरद पवार यांच्या गटातील नेत्यांवर निशाणा साधला. दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेचं अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्यामुळेच, रोहित पवारांना सर्वप्रथम याच नेत्यांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. त्यातूच, त्यांनी या नेत्यांना शरद पवारांनी दिलेल्या पदांची जाणीव करुन दिलीय. 

शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ज्यांच्यी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे, ज्यांच्या फुटण्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्या नेत्यांना रोहित पवारांनी लक्ष्य करत शरद पवारांनी करुन दिलेल्या उपकाराची जाणीवच करुन देण्याचा प्रयत्न केलाय. आधी दिलीप वळसे-पाटील यांच्यासंदर्भात पोस्ट लिहून आता प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

प्रफुल्ल पटेल साहेब, पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली. जमिनीपेक्षा आपलं 'विमान' हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला. तसेच, प्रफुल्ल पटेल यांचा फोटो ट्विटरवरुन शेअर करत, आमदार पवार यांनी अजुन काय पाहिजे? या मथळ्याखाली त्यांचा प्रवासच उलगडला आहे. नगराध्यक्ष ते केंद्रीयमंत्री असा प्रफुल्ल पटेल यांचा प्रवास केवळ शरद पवारांमुळेच झाल्याचं रोहित यांनी म्हटलं आहे. तसेच, असा अन्याय आमच्यावरही व्हावा, असं लोकं म्हणतील, असेही त्यांनी म्हटलंय. 

वळसे पाटील यांच्यावरही निशाणा 

रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. "वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?" असं म्हणत निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय" असं म्हणत रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :रोहित पवारप्रफुल्ल पटेलराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार