Join us

आमचा अन् जे जे रुग्णालयाचा संबंध संपला, डॉ. तात्याराव लहाने यांची उद्विग्नतेतून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 6:17 AM

काही दिवसांपासून निवासी डॉक्टर आणि नेत्र विभागातील डॉक्टर यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असून निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. 

मुंबई : संपूर्ण राज्यात डोळ्यांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध असलेले जे जे रुग्णालय आणि डॉ. तात्याराव लहाने यांचे ३८ वर्षांपासून असलेले नाते शुक्रवारी संपुष्टात आले. विविध आरोपांमुळे व्यथित झालेल्या डॉ. लहाने यांनी अन्य सहकाऱ्यांसह जे. जे. ला रामराम केला. गेल्या काही दिवसांपासून निवासी डॉक्टर आणि नेत्र विभागातील डॉक्टर यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असून निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. 

जे. जे. मधील राजीनाम्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी डॉ. लहाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, निवासी डॉक्टरांच्या आरोपांनंतर आम्हाला चौकशीसाठी न बोलविताच चौकशी समितीचा अहवाल देण्यात आला. आमची चौकशी करा, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

मोतीबिंदू निर्मूलनासाठी राज्यात कुठेही शस्त्रक्रिया करण्याची सरकारने मला परवानगी दिली आहे. मात्र, स्वाभिमान दुखावून काही करण्याची इच्छा नाही. पत्रकार परिषदेला डॉ. लहाने यांच्यासह डॉ. प्रीतम सावंत, डॉ. शशी कपूर, डॉ. स्वरांजित सिंग, डॉ. सायली लहाने, डॉ. दीपक भट,  डॉ. अश्विन बाफना, नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख हजर होते. मात्र, पारेख यांनी पत्रकार परिषदेत सहभाग घेतला नाही. 

डॉ. लहाने म्हणाले...आम्ही विद्यार्थ्यांना टप्याटप्प्याने सर्जरी शिकवीत असतो. निवासी डॉक्टरांचे आरोप  निराधार आहेत. कनिष्ठ निवासी डॉक्टर - ३ च्या विद्यार्थ्यांना आम्ही शस्त्रक्रिया शिकवली आहे. दरवर्षी ७० ते ८० हजार रुग्ण येतात. जे. जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभाग महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेला विभाग आहे. आमची चौकशी करा, अशी मागणी होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.माझ्यात आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये कुठलाही वाद नाही. मी मुंबईत प्रभादेवी येथे वर्षभरापूर्वी रघुनाथ नेत्रालय सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नाही. आजही सकाळी सात ते ३.३० वाजेपर्यंत जे. जे. रुग्णालयात मी सेवा देत असतो. वैद्यकीय आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच डॉ. सुमित लहाने यांना जे. जे. मध्ये बोलवत होतो. मात्र, अधिष्ठाता गुन्हा दाखल करण्यापर्यंत गेल्या आहेत. रुग्णसेवेसाठी तुरुंगात जावे लागले तर जा, असे डॉ. सुमित यांना सांगितले आहे. 

निवासी डॉक्टरांच्या आरोपानंतर आता नेत्र विभागात काम करण्याची इच्छा नसल्याने मी आणि माझ्या अन्य सहकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे जे. जे. रुग्णालय आणि आमचा संबंध संपला आहे. डॉ. रागिणी पारेख यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो मंजूर करून आम्हा सर्वांना कार्यमुक्त करावे. डॉ. तात्याराव लहाने

टॅग्स :हॉस्पिटलडॉक्टर