मुंबई : बोरीवलीतील ‘पॉप्युलर टेरेस’ या तडा गेलेल्या इमारतीत राहणाऱ्या पंधरा कुटुंबांची सध्या परवड सुरू आहे. त्यांचे साहित्य राहत्या घरांमध्ये अडकले आहे. मात्र, त्यांनी आशा असलेल्या एनडीआरएफच्या पथकाने ‘माणसांची जबाबदारी आमची आहे, साहित्याची नाही...’ असे उत्तर दिल्याने जीवनावश्यक वस्तूसाठी या कुटुंबीयांना वणवण करावी लागत आहे.मुंबईत गेल्या आठवड्यात पावसाने थैमान घातले होते. त्या वेळी ‘पॉप्युलर टेरेस’ या इमारतीला तडे गेले होते. परिणामी, या ठिकाणी राहणाºया लोकांनी ही इमारत तातडीने रिकामी केली. मात्र, जीव वाचविताना त्यांचे साहित्य इमारतीमध्येच राहिले. यात सध्या परीक्षा सुरू असलेल्या विद्यार्थ्यांची पुस्तके, वृद्धांची औषधे, पैसे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. इमारतीमध्ये प्रवेश करण्यास त्यांना प्रशासनाकडून बंदी आहे. पालिका प्रशासन, अग्निशमन दलाने कुटुंबांना इमारतीबाहेरच रोखले होते. एनडीआरएफचे पथक आल्यानंतर तुमचे साहित्य मिळेल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते.बुधवारी रात्री ९च्या सुमारास एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, माणसांना वाचविण्याची जबाबदारी आमची आहे. साहित्याबाबत आम्ही काहीच करू शकत नाही, असे उत्तर या पथकाकडून देण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे ते सध्या हवालदिल झाले आहेत. पालिका त्यांना कोणतेच सहकार्य करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यात लहान मुले, स्त्रिया आणि वृद्धांची फारच हाल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याबाबत योग्य तो तोडगा काढण्याची विनंती त्यांच्याकडून केली जात आहे.
आमची जबाबदारी केवळ माणसांना वाचविण्याची - एनडीआरएफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 4:48 AM