लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे शिवसेना गहाण ठेवली, असा आरोप उद्धव ठाकरे गटावर होत असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार भास्कर जाधवांसोबत केलेल्या विधानाचा व्हिडीओ मनसेकडून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओत जयंत पाटील हे आमदार भास्कर जाधव यांना उद्देशून आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना असे म्हणत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर पोटातले ओठावर आले, अशी टीका मनसेकडून करण्यात आली आहे. नागपूर येथे विरोधकांच्या पत्रकार परिषदेदरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार हे बोलण्याआधी जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात संवाद झाला.
या संवादावेळी जयंत पाटील ‘आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना’ असे म्हणाले. त्यावर भास्कर जाधव हसले आणि त्याला होकार दिला. या वाक्याचा पुनरुच्चारही करण्यात आला. या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा वादात सापडली. मनसेपाठोपाठ त्यांना भाजपकडूनही लक्ष्य करण्यात आले. भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी उद्धवजींची शिवसेना राष्ट्रवादीच्या ताटाखालची मांजर झाली आहे. तेच जयंत पाटील बोलले आणि त्याला भास्कर जाधव यांनी प्रतिसाद दिलेला आहे, अशा शब्दांत टीका केली.
वेगळा अर्थ काढू नका : अजित पवार
जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका. बाळासाहेबांनी त्यांचे वय झाल्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. तसेच युवा नेतृत्व आदित्य ठाकरे करतील, असे सांगितले होते, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"