Join us

आमचे काम चालू आहे, तुमच्या वेळा बदला... मध्य रेल्वेचे सर्व खासगी यंत्रणांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 6:15 AM

लोकल गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत पत्र पाठविण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढत आहे.  सकाळी आणि संध्याकाळी होणारी गर्दी आणि अपघात टाळण्यासाठी सर्व प्रशासकीय, खासगी यंत्रणांना यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत बदल करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत ८३ टक्के प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. गर्दीमुळे अपघाताच्या घटनांत वाढ होत असून गर्दीमुळे लोकल सेवा विलंबाने धावण्याच्या तसेच प्रवाशांना कार्यालय अथवा घरी पोहोचण्यास उशीर होत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सकाळ-संध्याकाळची गर्दी टाळण्यासाठी १ नोव्हेंबरपासून दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, लवकरच शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, पालिका अशा सर्व इतर यंत्रणांना देखील लोकल गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत पत्र पाठविण्यात येणार आहे. प्रतिदिन मध्य रेल्वेवर १८०० हून अधिक लोकल फेऱ्या धावतात, तर ३८ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात; परंतु दुसऱ्या बाजूला या वाढत्या गर्दीमुळे अपघाताच्या, चोरीच्या चेंगराचेंगरीच्या घटनांत वाढ झाली आहे. 

आम्ही बदलत आहोत, तुम्हीही बदला

  • सकाळ आणि संध्याकाळच्या लोकल गर्दीने कित्येकांचे जीव घेतले आहेत. अनेक वर्षांपासून याबाबत नियोजन करण्यात येत आहे. मात्र, ते शक्य झाले नाही.
  • म्हणून स्वतः आम्ही पुढाकार घेतला असून मुंबई विभागीय व्यवस्थापक विभागातील २ हजार कर्मचारी १ नोव्हेंबरपासून दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. सकाळी ९:३० ते सायं ५:४५ आणि  सकाळी ११:३० ते रात्री ७:४५ अशा शिफ्ट असतील. 
  • मी इतर सर्व सामाजिक संस्थांना आवाहन करतो की, तुम्ही पुढे या आणि रेल्वे अपघात टाळण्यासाठी समाज प्रबोधन करण्यास साथ द्या.

- रजनीशकुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवरील अपघाती मृत्यू

  • २०२२ - ५६० हून अधिक
  • २०२३ - ३५० हून अधिक 
टॅग्स :मध्य रेल्वेमहाविद्यालयशाळाहॉस्पिटल