आमच्या तरुण पिढीने वाचनासाठी जोर लावला आहे; 'लोकमत'च्या मुलाखतीत शंतनू नायडू यांनी व्यक्त केले मत
By अतुल कुलकर्णी | Updated: April 6, 2025 11:42 IST2025-04-06T11:41:52+5:302025-04-06T11:42:51+5:30
लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर शंतनू नायडू यांची लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.

आमच्या तरुण पिढीने वाचनासाठी जोर लावला आहे; 'लोकमत'च्या मुलाखतीत शंतनू नायडू यांनी व्यक्त केले मत
"आमची तरुण पिढी वाचत नाही म्हणून आमच्या पिढीकडून ती आशा सोडण्यात आली होती, पण वास्तवात आमच्या तरुण पिढीने वाचनासाठी जोर लावला आहे. त्यासाठीच 'लोकमत'ने हा विशेष पुरस्कार देऊन आमचा गौरव केला. हा गौरव आमचा नसून वाचकांचा आहे; परंतु भविष्यात वाचनाचा प्रसार करण्यासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये," अशी भावना टाटा मोटार्सचे जनरल मॅनेजर शंतनू नायडू यांनी लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केली.
'मुंबई बुकीज' ही वाचन संस्कृती वाढविणारी चळवळ उभी करणारे नायडू यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी नायडू यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. वाचनाची चळवळ मुंबईसह देशातील चार राज्यांत सुरू असल्याचे सांगत, एआयच्या काळात डिजिटल वाचन चांगले की वाईट यावर उत्तर देताना नायडू म्हणाले की, पुस्तकाला एक गंध असतो, पाने उलटताना त्याचा आवाज होतो, पुस्तक जुने झाल्यावर त्याची पाने पिवळसर पडतात. हे सगळे डिजिटल पुस्तक वाचनात अनुभवता येत नाही. झोपून पुस्तक वाचताना ते तोंडावर पडले तर चालू शकते, पण मोबाइलवर डिजिटल पुस्तक वाचताना तो तोंडावर पडला तर? नायडू यांच्या उद्गारांनी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
निर्सगाच्या कुशीत बसून वाचन करणे हे अत्यंत चांगले. निर्सगाच्या मांडीवर बसून केलेल्या वाचनाचा आनंद शांत आणि सुखद असतो. तो अन्य कुठेही मिळणार नाही. हे वातावरण 'मुंबई बुकीज'ने मुंबईतील उद्यानांमध्ये निर्माण केले. तरुणाई काय वाचते? या प्रश्नावर नायडू म्हणाले की, तरुणाई स्वसाहाय्यतेची, मार्गदर्शनपर पुस्तकांसह उद्योग आणि उद्योजकांची पुस्तके वाचते. त्यांना विविध प्रकारची पुस्तके पुरविली गेली पाहिजेत. नोकरी लागल्यावर वाचन कमी होते का? या प्रश्नावर नायडू म्हणाले की, शालेय जीवनात मी रात्री अडीच वाजेपर्यंत वाचन करीत असे.
आता ते शक्य नसले तरी विमानात प्रवास करताना मी वाचतो. तसेच माझेसुद्धा वाचन मुंबई बुकीजमध्ये होते. बीएमसीच्या शाळेतील मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी आठ हजार पुस्तके उभी केली. पुस्तकात काय आहे हे सांगून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली पाहिजे.
वृद्धांना नातवंडे भाड्याने देतो
ज्या वृद्धांची मुले, मुली परदेशात आहेत, त्यांना नातवंडे भाड्याने देण्याचा उपक्रम आम्ही राबवितो. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. त्यांचा एकटेपणा घालविण्याकरिता आम्ही हा उपक्रम सुरू केला. आगामी पंधरा वर्षांत भारतात वृद्धांची संख्या वाढणार आहे, असे नायडू म्हणाले.
आई मराठी शाळेत शिक्षिका
माझा आणि मराठी भाषेचा परिचय घरातील स्वयंपाक करणाऱ्या काकू आणि रस्त्यावरील वाहतूक पोलिसकाका यांच्यापुरता असला तरी मला मराठी चांगले येते. माझी आई गेली ३० वर्षे पालिका शाळेत मराठीची शिक्षिका आहे. याठिकाणी मी मुलाखतीत काही चुकीचे शब्द बोललो असेन तर त्याबद्दलचे मेसेज माझ्या मोबाइलवर आईने पाठविले असतील. माझी आई घरात शिक्षिका आणि शाळेत मुलांची आई आहे. शिक्षकांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त इलेक्शनची आणि सर्वेक्षणाची कामे दिली जातात. अशा परिस्थितीत ते मुलांना शिकविण्याकरिता कसा वेळ देणार, अशी खंत नायडू यांनी व्यक्त केली.
मराठी मुलीशी लग्न करायला आवडेल
आयुष्यातील जोडीदार कशी हवी, असे विचारले असता नायडू म्हणाले की, मराठी मुलीशी लग्न करायला आवडेल. मात्र, बघू कोण मिळेल ते? माझे वय ३३ असले तरी माझा चेहरा वय दाखवत नाही.
मला श्वानप्रेमाची शिकवण घरातून मिळाली. आमच्या सोसायटीत कोणी श्वानाला मारले तर आम्ही त्यांच्याशी भांडण करतो. माझी आई कुणाला कुत्र्याला हात लावू देत नव्हती. तिच्याकडून श्वानप्रेमाचे बाळकडू मिळाले.