... आमचे वेसाव्याला हाय शिमगा, हावलीची मजा काही औरच!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 08:39 PM2018-02-28T20:39:19+5:302018-02-28T20:39:19+5:30

देशात केरळ नंतर मासेमारीत वेसाव्याचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र मुंबईच्या कॉंक्रीटच्या जंगलात आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. मुंबईतील वेसावे गावच्या होळीची मजा आणि पारंपारिक थाट काही औरच आहे. येथील हावली पाहण्यासाठी परदेशी पाहुणे आणि छायाचित्रकार आवर्जून येतात.

... ours, we do not have anything else! | ... आमचे वेसाव्याला हाय शिमगा, हावलीची मजा काही औरच!

... आमचे वेसाव्याला हाय शिमगा, हावलीची मजा काही औरच!

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : देशात केरळ नंतर मासेमारीत वेसाव्याचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र मुंबईच्या कॉंक्रीटच्या जंगलात आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. मुंबईतील वेसावे गावच्या होळीची मजा आणि पारंपारिक थाट काही औरच आहे. येथील हावली पाहण्यासाठी परदेशी पाहुणे आणि छायाचित्रकार आवर्जून येतात.
येथे गोताच्या किवा पाटलांच्या हावलाच्या दिवशी पारंपारिक वेशभूषेत रात्री ८:३० च्या सुमारास भव्य मिरवणुक काढली जाते. वेसावे गावातील बाजार गल्ली व मांडवी गल्ली जमातीचा या मिरवणुकीत मोठा सहभाग असतो. कोळी महिला पारंपारिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर रंगीत मातीचे मडके घेवून गावात मिरवतात त्याच प्रमाणे पुरूष मंडळी विविध देवी देवतांचे अथवा इतर सोंग घेऊन आपली कलाकारी सादर करतात अथवा गाणी म्हणत गावात फिरतात. साथ असते ती सुमधुर कोळी गीत वाजवणाऱ्या वेसाव्यातील कोळी बँड पथकांची. वेसावे गावातील ९ गल्ल्या दरवर्षी मोठ्या उत्साहात होळी साजरी करतात. मुळात कोळी जमात ही एक कष्टकरी जमात असून खोल समुद्रात  मासेमारी नंतर सुखरूप घरी परतल्यावर आनंद साजरा करण्यासाठी कोळी राजा आपल्या पारंपारिक शिमग्या सारख्या सणांचे माध्यम शोधत असतो असे बाजार गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष पराग भावे व मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष पंकज जोनचा यांनी सांगितले.
शिमगा अथवा होळीकोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी जमातीचा महत्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण. मुळात कोळी लोकांची हावली ही १५  दिवस साजरी होते, ज्यात सुरवात होते ती गावातील लहान मुलांच्या होळी पासून. पण शेवटचे दोन दिवस होलीका दहनासाठी महत्वाचे मानले जातात. होळी पोर्णिमेच्या आदल्या दिवशी साजरी होणाऱ्या होळीला कोळी भाषेत कोमार/कोंबार हावली म्हटले जाते जी गावातील कुमार तरूण पोरं साजरी करतात.
होळी पोर्णिमेला साजरा होणाऱ्या होळीला गोताची हावली किंवा पाटलाची होळी म्हणतात ज्याला अग्नी देण्याचा मान गावचा पाटील अथवा गल्लीच्या अध्यक्षाला असतो.होळी पेटवताना बोंबा मारण्याची पुरातन परंपरा देखील कोळीवाड्यात पहायला मिळते. रात्री १२ ते १ च्या सुमारास होळी भवती मडकी रचून, प्रदक्षिणा घालुन वाजत गाजत हावलायला अग्नी देण्यात येतो अशी माहिती राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी दिली.
वेसावे गावातील डोंगरी गल्लीतील होळीचा वेगळेपणा म्हणजे होळी भवती काढली जाणारी सुरेख भव्य रांगोळी. त्याचबरोबर होळी दहनानंतर कोळी महिला गुलालाची उधळन करत पारंपारीक गीतांच्या ठेक्यावर नाचत नाचत हावलायला प्रदक्षिणा घालतात असे डोंगरी गल्लीचे ज्येष्ठ सभासद भगवान भानजी व प्रदीप टपके यांनी सांगितले.
वेसावे कोळीवाड्याची पुरातन परंपरा टिकावी व परंपरेचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने होण्यासाठी सरकारी यंत्रणांनी खास करून सरकारच्या सांस्कृतिक व पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय मंत्र्यानी प्रयत्न केले पाहिजेत, कारण जर गोवा, उत्तर प्रदेश सारखे राज्य त्यांच्या होळीला शिगमोत्सव आणि लठमार होली म्हणून प्रचार आणि प्रसार करू शकतात तर मग आपला महाराष्ट्र देखील वेसावकरांच्या ह्या पारंपारिक शिमग्याचा पर्यटनाच्या दृष्टीने प्रचार करू शकतो असे एमबीए मार्केटिंगचा विद्यार्थी मोहित रामले यांनी सांगितले. यामुळे येथील कोळीवाड्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन वेसावे गावाचा विकास होइल असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Web Title: ... ours, we do not have anything else!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.