कुलदीप घायवट
मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी आणि तोट्यातील एसटी महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी १८ हजार बसमध्ये तांत्रिक बदल करून त्यांना एलपीजी गॅसवर चालविण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. मात्र १८ हजारपैकी फक्त ५ बसचे प्रायोगिक तत्वावर काम सुरू आहे. बसमध्ये तांत्रिक बदल करण्यात येत आहेत. या बदलामुळे वर्षाला एक हजार कोटी रुपयांचा नफा होणार आहे.
मागील वर्षी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या राज्यातील १८ हजार बस एलपीजीवर धावण्याची घोषणा केली होती. असा प्रयोग करणारे देशातील महाराष्ट्र राज्य पहिले राज्य ठरणार आहे. मात्र एका वर्षात १८ हजार बसपैकी राज्यभरात फक्त ५ बसचे इंजिन, इंधन टाकी काढून असे तांत्रिक बदल करून एलपीजी बसमध्ये रूपांतर केले जात आहे. हे काम प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. या बसचा वापर प्रवासी अथवा कोणत्याही वाहतुकीसाठी सुरू केला नाही. या बसची सर्व तपासणी, काही चाचण्या घेण्यात येईल. यामधून बसच्या निकालातून बस सुरू होईल की नाही हे ठरणार आहे. एका बसला एलपीजी बसमध्ये बदल करण्यासाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च येत आहे, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. दरम्यान, लॉकडाऊन असल्याने बस एलपीजीमध्ये रूपांतर करण्याचा वेग कमी झाला आहे, अशी माहिती एका एसटी अधिकाऱ्यांनी दिली.
डिझेलला पर्याय म्हणून एलपीजी बस लवकर सुरू करणे आवश्यक आहे. एलपीजीमुळे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हातभार लागेल. एसटीचा डिझेलवरील खर्च वाचेल. सध्या एसटी महामंडळाचा संचित तोटा ६ हजारपेक्षा जास्त झाला आहे. एसटीने उत्पन्न मिळविण्यासाठी मालवाहतूक सुरू केली आहे. त्याप्रमाणे, डिझेलवरील खर्च वाचविण्यासाठी एलपीजी बस सुरू करणे आवश्यक आहे.
- रोहित धेंडे, एसटी प्रवासी
एसटीचा संचित तोटा वाढत आहे. एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी एसटीसाठी उपयुक्त घोषणा पूर्ण करण्यासाठी कामे जलदगतीने केली पाहिजेत. एलपीजी बसमुळे इंधनावरील खर्च कमी होईल. परिणामी, एसटीच्या उत्पन्नास हातभार लागेल. राज्यातील पर्यावरणासाठी देखील एलपीजी बस उपयुक्त असल्याने यावर प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. राज्यभरातील कानाकोपऱ्यात एलपीजी सिस्टम सुरू झाली पाहिजे. एसटीच्या भविष्यासाठी हे फायदेशीर आहे.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, एसटी कामगार काँग्रेस (इंटक)