ठाण्यात २६६३ पैकी ९४१ रुग्णांवर सुरु आहेत घरीच उपचार, सात दिवसात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत १९७९ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 02:37 PM2020-09-08T14:37:38+5:302020-09-08T14:48:04+5:30
ठाण्यात मागील सात दिवसात नव्या १९७९ रुग्णांची भर पडली आहे. आॅगस्ट महिन्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र सप्टेंबर महिना उजाडताच ही संख्या पुन्हा वाढतांना दिसत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ३ टक्यांनी घटले असून याच सात दिवसात २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
ठाणे : गणपती विसर्जन झाले आणि ठाण्यात पुन्हा एकदा कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मागील सात दिवसात नवीन १९७९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या घडीला शहरात प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ही १७४५ वरुन २६६३ वर जाऊन पोहचली आहे. तर या कालावधीत बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण हे आता ९० टक्यांवरुन ८७ टक्यांवर आले आहे. तर याच कालावधीत २५ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत ८६४ जणांचा मृत्यु झाला आहे. त्यातही जमेची बाब म्हणजे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या २६६३ रुग्णांपैकी ९४१ रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही आॅगस्ट पर्यंत कमी होतांना दिसत होती. विशेष म्हणजे एकीकडे रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील ९० टक्यांवर गेले होते. परंतु सप्टेंबर महिन्यात कोरोनाची पुन्हा लाट येईल असे बोलले जात आहे. त्यानुसार सप्टेंबर महिना उजाडला आणि कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. ठाण्यात ३१ आॅगस्ट पर्यंत १७४५ रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत होते. तर त्यात ७ सप्टेंबरपर्यंत ९१८ रुग्णांची वाढ झाली असून ही संख्या आता २६६३ एवढी झाली आहे. तर याच कालावधीत म्हणजेच ३१ आॅगस्ट पर्यंत २३३२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. तर ७ सप्टेंबरपर्यंत त्यात १११७ रुग्णांची भर पडली असून ही संख्या २४४४२ एवढी झाली आहे. एकूणच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील आता मागील सात दिवसात ९० टक्यांवरुन ८७ टक्यांवर आले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे तीन टक्यांनी कमी झाल्याचेच दिसत आहे. तर मागील सात दिवसात शहरात १९७९ नव्या रुग्णांची भर ठाण्यात पडली आहे. मागील सात दिवसात रोजच्या रोज २७० ते ३८० पर्यंत नवीन रुग्ण ठाण्यात आढळत आहे. यामध्ये माजिवडा मानपाडा आणि नौपाडा प्रभाग समितीत जास्त प्रमाणात रुग्ण आजही आढळत आहेत. तर याच सात दिवसांच्या कालावधीत २५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. ३१ आॅगस्ट पर्यंत शहरात ८३९ जणांचा मृत्यु झाला होता. तर ७ सप्टेंबर पर्यंत ही संख्या ८६४ वर जाऊन पोहचली आहे.
दरम्यान रुग्णांचे प्रमाण वाढत असतांना दुसरीकडे ठाणेकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ठाण्यात २६६३ रुग्णांपैकी ९४१ रुग्ण हे घरीच उपचार घेत असून त्यांची प्रकृ ती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली. तर १७२२ रुग्ण हे शहरातील विविध भागात असलेल्या कोवीड रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे घरी उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ही थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासादायकच म्हणावी लागणार आहे.