मुंबई : मुंबईतील सार्वजनिक शौचालय विनामूल्य करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, नियमांचे पालन न करणाऱ्या व मनमानी शुल्क आकारणा-या शौचालयांनाब्या तात घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत अशी ४४ शौचालये ताब्यात घेऊन, तिथे विनामूल्य सेवा सुरू करण्यात येणार आहे.मुंबईतील सर्व शौचालय विनामूल्य करण्याची घोषणा अर्थसंकल्पातून केल्यानंतर, सर्व सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील सशुल्क शौचालयांची पाहणी करून, आपला अहवाल मासिक आढावा बैठकीत शनिवारी सादर केला. स्वच्छता नसणे, निर्धारित दरापेक्षा अधिक शुल्क आकारणे किंवा शौचालयाचा नियमबाह्य वापर होणे या तीनपैकी कोणतीही एक बाब आढळून आल्यास, अशा शौचालयांना तत्काळ नोटीस देऊन, ते ताब्यात घेण्याची कार्यवाही पालिकेने सुरू केली आहे.ताब्यात घेण्यात आलेली शौचालये नव्याने बांधण्याची कार्यवाही व संबंधित निविदा प्रक्रियेस सुरुवात करावी. बांधण्यात येणारी नवीन शौचालये नि:शुल्क असावीत, असे आदेश आयुक्तांनी दिले.- नवीन शौचालये बांधण्याची कार्यवाही करताना शौचालयांचे आरेखन हे संबंधित परिसराची (उदा. रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी परिसर इत्यादी) गरज ओळखून तयार करण्यात येणार आहे.- या शौचालयांचे आरेखन हे अधिक सुविधाजनक व उपलब्ध जागेचा अधिक परिणामकारक उपयोग करणारे असणार आहेत.- मुंबईतील ८९२ शौचालयांपैकी ४४ ठिकाणी उल्लंघने आढळून आल्याने, ती महापालिकेने ताब्यात घेतली आहेत. या ठिकाणी नि:शुल्क शौचालये उभारण्यात येत आहेत.
नियमबाह्य शुल्क आकारणारी ४४ शौचालये पालिकेच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 4:13 AM