आईशी वाद घालणाऱ्या मुलाला घराबाहेरचा रस्ता; उच्च न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 04:02 AM2019-12-31T04:02:56+5:302019-12-31T04:22:47+5:30
पर्यायी घर शोधण्यासाठी दिला दोन महिन्यांचा अवधी
मुंबई : उतारवयातील आईशी सतत वाद घालून तिला मानसिक त्रास देणाºया धाकट्या मुलाला त्याच्या पत्नी व दोन मुलांसह आईच्या घरातून गाशा गुंडाळण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. मुले शिकत असल्याने पर्यायी घर शोधण्यासाठी उच्च न्यायालयाने मुलाला दोन महिन्यांचा अवधी दिला.
धाकटा मुलगा व त्याची पत्नी सतत वाद घालून मानसिक छळ करत असल्याचा व देखभालीचा खर्च देत नसल्याची तक्रार बोरीवली येथे राहणाºया ६५ वर्षीय सुनीता गडकर (बदललेले नाव) यांनी लवादाकडे केली. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य आढळल्याने लवादाने गडकर यांचा धाकटा मुलगा अनिल गडकर (बदललेले नाव) याला त्याच्या पत्नी व दोन मुलांसह आईचे घर सोडण्याचा आदेश दिला. मात्र, अनिल याने या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
मोठा भाऊ व त्याच्या पत्नीच्या प्रभावाखाली येऊन आई आपल्यावर खोटे आरोप करत आहे. मुंबईत घरे महाग असल्याने आपला मोठा भाऊ आईचा आधार घेऊन आपल्याला संपत्तीतून बेदखल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप अनिल यांनी याचिकेद्वारे केला आहे.
सुनीता व त्यांच्या पतीने मिळून २००५ मध्ये बोरीवलीमध्ये एक घर घेतले. त्यात ते दोघे व त्यांची दोन मुले एकत्र राहत होती. कालांतराने मुलांचा विवाह झाला. मुले, सुना व नातवंडे असा गोतावळा या घरात राहत आहे. काही वर्षांनी गडकर यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांची पत्नी सुनीता, मुले, सुना आणि नातवंडे असे या घरात राहू लागले. तसेच सुनीता यांच्याबरोबर त्यांची ८३ वर्षीय आईही राहू लागली.
दरम्यान, धाकटा मुलगा व त्याची पत्नी सुनीता यांच्याबरोबर वाद घालू लागले. तसेच मोठा भाऊ व त्याच्या पत्नीशीही भांडू लागले. सुनीता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मोठा मुलगा व त्याची पत्नी आपला सांभाळ करत आहे. मात्र, धाकटा मुलगा व त्याची पत्नी आपल्याशी सतत वाद घालून आपला मानसिक छळ करत आहे. तो आपल्याला व आपल्या आईला मारेल, अशी भीती सुनीता यांनी न्यायालयात व्यक्त केली.
आपल्याला व आपल्या आईला या वयात मानसिक शांतता हवी. आमच्या दोघांची प्रकृती ठीक नसते, त्यात हे वाद सुरूच राहिले तर प्रकृती आणखी खालावेल, अशी भीतीही सुनीता यांनी व्यक्त केली.
‘मुलगा ज्येष्ठ नागरिकाचा म्हणजे स्वत:चीच आई सुनीताचा छळ करत आहे. वास्तविक हे घर सुनीता व त्यांच्या पतीच्या नावावर आहे. त्यांच्या पतीचा मृत्यू झाला असला तरी सुनीता जिवंत आहेत. त्यामुळे त्या जिवंत असेपर्यंत या संपत्तीवर त्यांची दोन्ही मुले अधिकार सांगू शकत नाहीत. त्यांच्या या घरावर दोन्ही मुलांचा अधिकार नाही’ असे न्यायालयाने सांगितले.
‘अशा स्थितीत, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून आणखी दिवाणी दावे दाखल करून आईला शांततेत जीवन जगू न देण्यापेक्षा लवादाने दिलेला दिलासा कायम करणे योग्य आहे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने धाकट्या मुलाला त्याच्या पत्नी व मुलांसह दोन महिन्यात आईचे घर सोडण्याचा आदेश दिला. न्यायालयाने दिलेल्या या आदेशावर आईच्या वकिलांनी अनिल गडकर यांना दोन महिन्यांचा अवधी न देता तत्काळ घर सोडण्याचा आदेश देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने नकार दिला.
‘नातवांबाबत असंवेदनशीलता दाखवू नये’
‘दोन लहान मुले शिकत आहेत. त्यांच्या आजीने त्यांच्याप्रति इतकी असंवेदनशीलता दाखवू नये, कारण ही तिचीच नातवंडे आहेत,’ असे म्हणत अनिल गडकर यांना पर्यायी घर शोधण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली. तसेच या मुदतीत आईचे घर न सोडल्यास पोलीस त्यांना घरातून जबरदस्तीने बाहेर काढतील, असा इशाराही उच्च न्यायालयाने अनिल गडकर यांना दिला.