श्रीनगरमधील गलाई बांधव संपर्काबाहेर

By admin | Published: September 11, 2014 10:22 PM2014-09-11T22:22:27+5:302014-09-11T23:04:29+5:30

विटा तहसीलमध्ये आपत्ती कक्ष : नातेवाईक भीतीच्या छायेखाली

Out of contact with the Gwalai brothers in Srinagar | श्रीनगरमधील गलाई बांधव संपर्काबाहेर

श्रीनगरमधील गलाई बांधव संपर्काबाहेर

Next

विटा : काश्मीरमधील झेलम नदीचे पाणी श्रीनगरसह काश्मीर शहरात शिरल्याने सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त तेथे स्थायिक झालेले शेकडो गलाई बांधव अद्यापही संपर्काबाहेर आहेत. या पुरात अडकलेले सर्वाधिक गलाई बांधव खानापूर तालुक्यातील हिवरे, रेवणगाव, घोटी, ढवळेश्वर, खेराडे-वांगी परिसरातील असल्याने, त्यांचे नातेवाईक भीतीच्या छायेखाली आहेत. गलाई बांधवांचा चार ते पाच दिवसांपासून संपर्क तुटला आहे.
खानापूर तालुक्यातील हिवरे, रेवणगाव, ढवळेश्वर, घोटी, खानापूर परिसरातील सुमारे २५० ते ३०० गलाई बांधव एकट्या श्रीनगर शहरात आहेत. येथील हनुमान मंदिर परिसरातील सोने-चांदी व्यापारी पेठेतील सर्वाधिक गलाई बांधव सध्या पुरात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. श्रीनगरमधील लाल चौक, कुकर बाजार, मुख्य मार्केट, जैना कदर या परिसरालाही पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे तेथील मराठी गलाई बांधव संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने, प्रत्येक घरात पाणी शिरल्याने लोकांनी घराच्या छताचा आधार घेतला आहे.
मंगरूळ (ता. खानापूर) येथील विशाल शिंदे सध्या जम्मू शहरात वास्तव्यास आहेत. तो भाग उंच ठिकाणी असल्याने तिथे पाणी पोहोचू शकलेले नाही. त्यांच्याशी आज (गुरुवारी) ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जम्मू व उधमपूर शहराला पुराचा तडाखा बसला नसल्याने तेथील गलाई बांधव सुखरूप आहेत. मात्र, पुराचा सर्वाधिक तडाखा श्रीनगर व काश्मीरला बसला आहे.
श्रीनगर येथे वास्तव्यास असलेले त्यांचे हिवरे (ता. खानापूर) येथील मामा लक्ष्मण ऊर्फ पोपट हसबे, सुधाकर हसबे, धनाजी हसबे, नितीन हसबे, सचिन हसबे, विनोद हसबे यांच्यासह रेवणगाव येथील पवन मुळीक, ढवळेश्वरचे बाळू किर्दत, सोलापूर जिल्ह्यातील भरत व खेराडे-वांगी येथील कुंडलिक सूर्यवंशी यांच्यासह सुमारे २५० ते ३०० गलाई बांधवांचा कोणताही संपर्क होत नसल्याने, ते पुरात अडकल्याची भीती विशाल शिंदे यांनी व्यक्त केली.
श्रीनगर व काश्मीर येथील शेकडो गलाई बांधवांचा संपर्क आज पाचव्या दिवशीही होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. श्रीनगर व काश्मीर शहरासह पूँछ, राजौरी, नवा शहर आदी भागालाही पुराचा तडाखा बसला असून या परिसरातील गलाई बांधवांचाही संपर्क होऊ शकत नाही.
दरम्यान, गावाकडील लोकांबरोबरच जम्मू, उधमपूर व अन्य राज्यात असलेल्या नातेवाईकांनीही पुरात अडकलेल्या मराठी लोकांशी संपर्कासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे. मात्र, त्यात त्यांना यश मिळू शकत नाही. जिल्हा प्रशासन व आटपाडी तहसील कार्यालयाने संपर्कसाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे खानापूर, तासगाव, आटपाडी, कडेगाव तालुक्यातील गलाई बांधवांच्या नातेवाईकांत भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)

विटा तहसील कार्यालयात आपत्ती कक्ष
काश्मीर, श्रीनगरसह तेथील अन्य भागाला पुराच्या पाण्याने वेढा दिला असल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विट्याच्या तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी, तहसील कार्यालयात मदतीसाठी २४ तास नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष सुरू केला आहे, त्यामुळे नातेवाईकांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नातेवाईकांच्या सुटकेसाठी (०२३४७) २७२६२६, ९४२२४०७८३६, ९८५०५६४५४६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Out of contact with the Gwalai brothers in Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.