Join us

राहुल गांधींच्या भाषणाच्या १५ मिनिटांपैकी ११ मिनिटे लोकसभा अध्यक्षांचा चेहरा दाखवला; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 4:41 PM

मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

मुंबई/नवी दिल्ली: केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी मणिपूर हिंसाचारवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत मणिपूरला गेले नाही. वास्तव म्हणजे आता मणिपूर उरलाच नाहीय. मणिपूरमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. मोदी सरकारने मणिपूरची हत्या केली, असा घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केला. 

मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. भारताचा आवाज एकच आहे. द्वेष दूर करावा लागेल. मी जेव्हा मणिपूरला गेलो होतो, तेव्हा तेथील स्थानिक नागरिकांशी, पीडित लोकांसोबत संवाद साधला. त्यावेळी एक महिला म्हणाली की, माझ्या डोळ्यांसमोर मुलाची गोळ्या घालून हत्या केली. रात्रभर ती आई त्या मृतदेहासोबत राहिली, असं राहुल गांधी यांनी सांगितले. 

राहुल गांधी जेव्हा मणिपूर हिंसाचारावर बोलत होते, तेव्हा  संसद टीव्हीने राहुल गांधींपेक्षा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा जास्त चेहरा दाखवल्याचा दावा महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना राहुल गांधी यांची इतकी भीती का? राहुल गांधी यांनी आज सभागृहात १५ मिनिटे भाषण केले. या दरम्यान संसद टीव्हीने ११ मिनिटे फक्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा चेहरा दाखवला. मणिपूर सारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा करणाऱ्या राहुलजींना फक्त ४ मिनिटांसाठी दाखवण्यात आले. लोकशाहीची हत्या हीच आहे. २०१४ पासून ही सतत सुरू आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

रावण फक्त दोन लोकांचे ऐकत असे-

रावण फक्त दोन लोकांचे ऐकत असे, मेघनाद आणि कुंभकर्ण. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी हे अमित शाह आणि अदानी या दोनच लोकांचे ऐकतात. हनुमानाने लंका जाळली नाही, अहंकाराने लंका जाळली. रामाने रावणाला मारले नाही, त्याच्या अहंकाराने मारले. तुम्ही देशभर रॉकेल फेकत आहात. तुम्ही हरियाणा जाळत आहात. तुम्ही संपूर्ण देश पेटवण्यात व्यस्त आहात, असा निशाणा राहुल गांधींनी भाजपावर साधला.

टॅग्स :राहुल गांधीसंसेदेचे पावसाळी अधिवेशनसंसदनरेंद्र मोदीओम बिर्ला