Join us

१८ हजार कोटींपैकी १० हजार कोटींचा महसूल सरकार दरबारी जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 6:14 AM

महसुलाचे उद्दिष्ट गाठण्यात उत्पादन शुल्क विभागाला ५५ टक्के यश

गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.७३ टक्क्यांची वाढखलील गिरकर 

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत २०१९च्या आर्थिक वर्षातील महसूल उद्दिष्टांपैकी ५५.६० टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश मिळवले आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीसाठी १८ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे उत्पादन शुल्क विभागाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५५.६० टक्के म्हणजे १० हजार ७ कोटी रुपयांचा महसूल जमवण्यात उत्पादन शुल्क विभागाला नोव्हेंबर २०१९ पर्यंत यश आले आहे.

ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर या सहा विभागांपैकी सर्वात जास्त ५ हजार ६६१ कोटी २१ लाख रुपयांचे उद्दिष्ट औरंगाबाद विभागाला देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ३५५ कोटी ५४ लाखांचा महसूल मिळवण्यात त्यांना यश आले आहे. त्याखालोखाल पुणे विभागाला ३ हजार ७३१ कोटी ३१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी २ हजार २०६ कोटी ४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

सर्वात कमी उद्दिष्ट नागपूर विभागाला ७३७ कोटी १४ लाख रुपयांचे होते. त्यापैकी ३९८ कोटी ७१ लाख रुपये महसूल मिळाला आहे. कोल्हापूर विभागाला १ हजार ३३१ कोटी ७ लाख रुपये महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट असताना या विभागात ७३१ कोटी ४३ लाख जमा झाले आहेत. नाशिक विभागाला ३ हजार ३४७ कोटी ९२ लाख रुपये महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट असताना या विभागाला १ हजार ८४५ कोटी ८९ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यासह ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या ठाणे विभागाला ३ हजार १९१ कोटी ३५ लाख रुपये महसुलाचे उद्दिष्ट असताना या विभागातून १ हजार ४६९ कोटी ६८ लाख रुपये महसूल जमा झाला आहे. ठाणे विभागातील मुंबई शहर जिल्ह्याला १४८ कोटी १२ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना २८ कोटी ८९ लाख रुपये महसूल जमा झाला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याला ४३३ कोटी ७७ लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना १०० कोटी ७७ लाख रुपये महसूल जमा झाला आहे. ठाणे जिल्ह्याला २१८ कोटी ४० लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४७ कोटी २१ लाखांचा महसूल जमा झाला आहे. रायगड जिल्ह्याला १ हजार ९२ कोटी १७ लाखांचे उद्दिष्ट असताना ६१६ कोटी १७ लाखांचा महसूल जमा झाला आहे. ठाणे विभागात सर्वात जास्त उद्दिष्ट पालघर जिल्ह्याला १ हजार २९८ कोटी ८९ लाख रुपयांचे आहे. त्यापैकी ६७६ कोटी ६४ लाख रुपये महसूल जमा करण्यात आला आहे.उत्पादन शुल्क विभागाला गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत राज्यभरातून ९ हजार १२० कोटी ३५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. त्या तुलनेत २०१९मध्ये ९.७३ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण उद्दिष्ट गाठण्यामध्ये डिसेंबर महिन्यातील विक्रीचा मोठा वाटा असतो. त्यामुळे मार्च २०२०पर्यंत यंदाचे १८ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यात नक्कीच यश मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :मुंबईमहसूल विभाग