लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :
कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर स्थलांतरित झाली आहेेत. ६ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे दिसून येत आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून १ते १० मार्चदरम्यान शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक असुरक्षितता, पालकांच्या मनातील भीती यामुळे बालमजुरीचे व बालविवाहाचे प्रमाण वाढणार आहे. १०० टक्के बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्काची पूर्तता करणे ही राज्याच्या दृष्टीने प्राधान्याची गरज असल्याने सर्व शासकीय विभागणीने एकत्र येऊन नियोजन करून कृती करणे आणि त्याचे सातत्याने नियंत्रण या मोहिमेतून करण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे.
या मोहिमेमध्ये बालकांचा शोध घेताना महानगरपालिका, ग्रामपंचायती, नगरपालिका यांमधील जन्म-मृत्यू अभिलेखामधील नोंदीचा वापर करता येणार असून, कुटुंब सर्वेक्षणेही करता येणार आहेत. प्रत्येक शहरात, गावात, गजबजलेल्या वस्त्यांत, रेल्वेस्टेशन, गुऱ्हाळघर, गावाबाहेरची पालं, वीटभट्टी, दगडखाणी, लोककलावंतांची वस्ती, भटक्या जमाती, सिग्नलवर फुले व अन्य वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भीक मागणारी मुले, तेंदूपत्ता वेचणारी, विड्या वळणारे आदी विविध ठिकाणी काम करणारे बालमजूर, वस्तीतील मुले यांची माहिती या शोधमोहिमेत घेण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या शोधमोहिमेत राज्यस्तरावर काम करणारे नोडल अधिकारी पर्यवेक्षक व प्रगणक काम पाहणार आहेत.
ही शोधमोहीम वस्ती, वाडी, गाव, वॉर्ड या स्तरावर पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत. शोधमोहिमेचा अहवाल गट पातळीवरील अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्हा नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या आहे. शिवाय या मोहिमेत १८ वर्षे वयोमर्यादेपर्यंतच्या दिव्यांग बालकांचाही समावेश असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या शोधमोहिमेची माहिती राज्यात व्यापक पद्धतीने व्हावी यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील समता विभागाने यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाॅट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम याद्वारे विविध संस्था, संघटना व स्वयंसेवी संस्था यांना जनप्रसार व्यापक प्रमाणात करण्याबाबत आवाहन करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. गाव, जिल्हा, तालुका पातळीवर स्थानिक कलाकार आणि नामांकित व्यक्तीमार्फत शोधमोहिमेमार्फत प्रत्यक्ष संवाद घडवून आणावा, असेही सांगण्यात आले आहे.