Join us

राज्यातील शाळाबाह्य मुले येणार शिक्षणाच्या प्रवाहात; शिक्षण विभागाने कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:20 AM

शिक्षण विभागाने कसली कंबर

मुंबई : कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर स्थलांतरित झाली असून, ६ ते १८ वयोगटांतील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे दिसून येत आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून १ ते १० मार्चदरम्यान शाळाबाह्य मुलांचा शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक असुरक्षितता यामुळे वाढणारे बालमजुरीचे व बालविवाहाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे १००% बालकांना शाळेच्या प्रवाहात आणणे ही राज्याच्या दृष्टीने प्रधान्याची गरज आहे. त्यासाठी सर्व शासकीय विभाग एकत्र येऊन नियोजन करून कृती करणे  व त्याचे सातत्याने नियंत्रण सदर मोहिमेतून करण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे.

निर्णय स्वागतार्ह, पण...

शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. परंतु महाराष्ट्रात वर्षभरात झालेले प्रचंड बालविवाह बघता शाळाबाह्यची ६ ते १४ वयोगटांची व्याख्या ओलांडून ९वी ते १२वीच्या मुली शाळेत आहेत का ? जर मुली गैरहजर असतील तर त्या कुठे आहेत, याची पाहणी यासोबतच करायला हवी. कारण कोरोना काळात या वयोगटातील मुलींचे मोठ्या प्रमाणावर बालविवाह झाले आहेत. शिवाय या सर्वेक्षण समितीत स्वयंसेवी संस्थेचा एकही प्रतिनिधी घेण्याची तरतूद नाही. जिल्हा तालुका समितीत फक्त एक सदस्य घ्यावा. अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा शासनाने उपयोग करून घ्यावा.- हेरंब कुलकर्णी,  सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :शाळामहाराष्ट्र सरकार