Join us

शाळाबाह्य मुलांचे होणार सर्वेक्षण

By admin | Published: July 02, 2015 10:34 PM

बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतरही राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले आढळून येत आहेत. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात

पालघर : बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतरही राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले आढळून येत आहेत. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हास्तरीय समितीसह गावस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ४ जुलै रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत घरोघरी, रेल्वे स्थानक व सर्व सार्वजनिक ठिकाणी फिरून एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी समित्या फिरणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिली.शाळेत न जाणारी बालके, ज्यांनी शाळेत प्रवेशच घेतलेला नाही किंवा ज्यांनी प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केले नसेल अशा ६ ते १४ वयोगटांतील बालकांचा यात समावेश आहे. राज्यात अशी शाळाबाह्य मुले मोठ्या प्रमाणात आढळून येत असून मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत अशा शाळाबाह्य मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शासनस्तरावरून सुरू आहे. राज्यातील शाळाबाह्य असलेल्या प्रत्येक बालकाची एकदिवसीय पाहणी कार्यक्रम ४ जुलै रोजी राज्यभर व्यापक स्वरूपात घेण्यात येणार आहे. या सर्वेक्षण कार्यक्रमात एकही मूल वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले. या वेळी बालकांच्या बोटाला निवडणुकीत लावतात, त्यापद्धतीने शाई लावण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष तर शिक्षणाधिकारी सदस्य सचिव, तालुकास्तरावर तहसीलदार अध्यक्ष तर गटशिक्षणाधिकारी सदस्य सचिव तर गावस्तरावर सरपंच अध्यक्ष तर मुख्याध्यापक सदस्य सचिव अशा समित्या नियुक्त केल्या आहेत.