नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी पुन्हा व्हावे शाळाबाह्य सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:22+5:302021-05-05T04:08:22+5:30

राज्यातील स्वयंसेवी संस्थांची शिक्षण विभागाकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिक्षण विभागाने केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणातून जी आकडेवारी ...

The out-of-school survey should be repeated before the new academic year | नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी पुन्हा व्हावे शाळाबाह्य सर्वेक्षण

नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी पुन्हा व्हावे शाळाबाह्य सर्वेक्षण

Next

राज्यातील स्वयंसेवी संस्थांची शिक्षण विभागाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिक्षण विभागाने केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणातून जी आकडेवारी समोर आली आहे, ती पुन्हा एकदा तपासण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्यातील शाळाबाह्य मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था व्यक्त करत आहेत. ही आकडेवारी म्हणजे शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नांची क्रूर थट्टा असून मूळ आकडेवारी याच्या कितीतरी पट भरणार असल्याचे मत या संस्थांच्या कार्यकर्त्याकडून होत आहे. बालकामगार, रस्त्यावरील मुले, वेश्यांची मुले, बालविवाह झालेल्या मुली ही वेगवेगळी संख्या एकत्र केली, तर काही लाखांत भरेल, पण सामाजिक संस्थांनी शिक्षणमंत्री यांच्याकडे आग्रह धरूनही त्यांनी जिल्हानिहाय संस्था सहभाग घेऊन नियोजन केले नाही. त्यामुळे ही आकडेवारी आली आहे. शाळाबाह्य मुलांचे किमान जून महिन्यात शाळा उघडण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे, अशी मागणी या सामाजिक व स्वयंसेवी संस्था करत आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने १ ते १० मार्च २०२१ राबवलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेतून ६ ते १४ वयोगटातील २५ हजार २०४ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्यापैकी ७,८०६ मुले कधीच शाळेत गेलेली नाहीत, तर १७,३९७ मुले अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झाल्याचे अहवालात नमूद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम तीन जिल्हे, दोन महापालिका क्षेत्र वगळता इतरत्र राबवण्यात आली नसल्याचेही अहवालात नमूद आहे. जिल्ह्यातून ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे.

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊन नसतानाही केलेल्या मागील शाळाबाह्य सर्वेक्षणातील मुलांची आकडेवारी यापेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. लॉकडाऊनकाळात तर गमावलेले रोजगार, स्थलांतर यामुळे मुले शिक्षणाच्या प्रवाहातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे नियमित शाळॆत जाणारी मुले ही शाळाबाह्य झाली आहेत, मग ही आकडेवारी एवढी कमी कशी, असा सवाल स्वयंसेवी संस्था उपस्थित करत आहेत. या परिस्थितीत खरेतर शिक्षणासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करून ‘कोरोना’मुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या मुलांकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून त्यांच्या सर्वेक्षणातच घोळ होत आले तर ही मुले शिक्षण प्रवाहात परतणार कशी, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या आधी शाळाबाह्य मुलांचे स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पुन्हा सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी या संस्था करत आहेत.

* चौकट

शाळेत प्रवेश न घेतलेली ६ ते १४ वयोगटातील मुले - ७,८०६

अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य मुले - १७,३९७

एकूण शाळाबाह्य मुले - २५,२०४

बालकामगार असलेली शाळाबाह्य मुले - २८८

अन्य कारणांनी शाळाबाह्य मुले - २३,७०४

---------------------------

Web Title: The out-of-school survey should be repeated before the new academic year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.