लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परराज्यातून येणाऱ्या वाहनचालकांना महाराष्ट्रात वाहतूक पोलीस त्रास देत आहेत. कागदपत्रे बरोबर असतील तरी त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात, मारहाण करतात, अशी व्यथा सांगणारा तेलंगणाच्या एका वाहन चालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तेलंगणाचा चालक शंकर याने व्हिडीओच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला आहे. शंकर याने म्हटले आहे, आम्ही तेलंगणा राज्यातून आहोत, आम्ही प्रवास करताना गाडीच्या संबंधित सर्व कागदपत्रे सोबत ठेवतो. सर्व कागदपत्रे बरोबर असतील तरीही वाहतूक पोलीस त्रास देतात, पैशांची मागणी करतात. या वाहतूक पोलिसांना पगार कमी पडत असून त्यांच्या पगारात वाढ करण्यात यावी. हे पोलीस केवळ पैशांची मागणीच करीत नाहीत तर मारहाणदेखील करतात. याची दखल घेऊन कारवाई करायला हवी.
तेलंगणाशिवाय इतर राज्यांतूनही बरीचशी वाहने येतात. राज्यातील शिर्डी आणि कोल्हापूर, पंढरपूर आदी ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी आणि मुंबईत पर्यटनासाठी येतात. पर्यटक राज्यात आल्यानंतर त्यांच्यापासून उत्पन्न मिळते. पण, वाहतूक पोलिसांना काय अडचण आहे? बाहेरच्या राज्यातील गाडी पाहिली की सरळ बॅरिकेड लावले जाते. कागदपत्रे बरोबर असूनही पैशांची मागणी केली जाते तसेच मारहाण केली जाते. असे का? तुम्ही तेलंगणा राज्यात या. तिकडे येऊन पाहा. तिकडे कोणीही वाहनचालकांची अडवणूक करीत नाही. कागदपत्रे तपासून लगेच सोडले जाते. पैसे मागितले जात नाहीत. शहर असो की ग्रामीण भाग सर्व ठिकाणी अशीच स्थिती आहे. एकदा तेलंगणाला भेट देऊन तेथील मुख्यमंत्री कसे प्रशासन चालवतात ते पाहा, असेही तो म्हणाला.