- सचिन लुंगसे मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात विविध प्रकल्पबाधितांसाठी विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या १ लाख १२ हजार घरांपैकी पडून असलेली ११ हजार घरे माहुल येथील ५ हजार ५०० प्रकल्पबाधितांना दिली तर आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या माहुलकरांच्या स्थलांतरणाचा प्रश्न सुटणार आहे.मुंबई शहर आणि उपनगरातील प्रकल्पबाधितांसाठी प्रशासनाने माहुल येथे एकूण ७२ इमारती बांधल्या असून, या इमारतींमध्ये १७ हजार २०५ घरे आहेत. माहुल येथील प्रदूषित परिसरातून सुरक्षित स्थळी म्हणजे जेथे शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी आहे तेथे स्थलांतर करण्यात यावे यासाठी माहुलवासीयांचा लढा सुरू आहे. माहुलवासीयांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आतापर्यंत न्यायालयाने माहुलवासीयांच्या बाजूने कौल दिला असला तरी अद्याप प्रशासनाने त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न सोडविलेला नाही.माहुलवासीयांनी २०१८ साली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, येथील प्रदूषणाचा दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाल्याचे म्हणणे मांडत दुसरीकडे स्थलांतरित करावे, असे म्हटले आहे. त्यानुसार न्यायालयाने प्रशासनास योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले असले तरी प्रशासनाने अद्याप काहीच कार्यवाही केली नसल्याची खंत माहुलवासीयांनी व्यक्त केली आहे.म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि शिवशाहीसारख्या प्रकल्पांत उभारण्यात आलेल्या घरांपैकी काही घरे माहुलवासीयांना देण्यात यावीत, अशी मागणी सातत्याने माहुलवासीयांकडून होत आहे. त्यांच्यासाठी अवघ्या ५ हजार ५०० घरांची आवश्यकता आहे.प्रकल्पग्रस्तांसाठी ८० हजार घरेकुर्ला येथे ‘एचडीएल’ने १८ हजार घरे बांधली आहेत आणि मुंबई शहर तसेच उपनगरात ठिकठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी ८० हजार घरे बांधण्याचे काम सुरू आहे. कुर्ला येथील घरे विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडीधारकांसाठी बांधण्यात आली असून, यातील काही घरे इतर प्रकल्पबाधितांना देण्यात आल्याचे म्हणणे माहुलवासीय सातत्याने आंदोलनादरम्यान मांडत आहेत. कुर्ला, कांजूरमार्ग, भांडुप येथे घरे उपलब्ध आहेत.२०० लोकांचा मृत्यू२०१५ सालानंतर माहुल येथे ८० लोकांचे मृत्यू झाले असून, ही गोष्ट माहिती अधिकाराखाली प्राप्त कागदपत्रांतून समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ८० मृत्यू हे माहिती अधिकारातून समोर आले असले तरी प्रत्यक्षात प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दोनशे असल्याचे माहुलवासीयांचे म्हणणे आहे.येथील रहिवाशांचे केले स्थलांतरमाहुलवासीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी विविध प्रकल्प सुरू आहेत. यातील बहुतांशी प्रकल्पग्रस्तांना प्रशासनाने माहुल येथे स्थलांतरित केले आहे. विशेषत: तानसा जलवाहिनीच्या कामादरम्यान प्रशासनाने घाटकोपर, अंधेरी, कुर्ला, साकीनाका, पवई, मरोळ येथील सुमारे ५ हजार ५०० रहिवाशांना माहुल येथे स्थलांतरित केले आहे.परिसर प्रदूषित, निरीचा अहवालतानसा जलवाहिनीव्यतिरिक्त विविध प्रकल्पग्रस्तांनाही माहुल येथे स्थलांतरित करण्यात आले असून, हा आकडा सुमारे २ हजार आहे. एकंदर सद्य:स्थितीत माहुल येथे वास्तव्य करीत असलेल्या प्रकल्पबाधितांची संख्या सुमारे ७ हजार ५०० आहे. मात्र माहुल येथील परिसर प्रदूषित असून तो राहण्यायोग्य नाही, असा अहवाल ‘निरी’ने दिला असून, येथील वायुप्रदूषणामुळे अनेकांना आजार जडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
‘त्या’ ११ हजारांपैकी ५,५०० घरे माहुलवासीयांना द्या; रहिवाशांची सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 4:05 AM