मुंबई : मेट्रो-३च्या कारशेडसाठी २७०० झाडे कापण्यास विविध स्तरातून तसेच तरुणाईचा जोरदार विरोध होत आहे. मंगळवारी बिग बी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विट करीत मेट्रोला समर्थन केले. त्यामुळे काही तरुणांनी बुधवारी सकाळी बिग बीच्या घराबाहेर ‘आरे वाचवा’चे समर्थन करीत शांततेत निदर्शने केली. लोकशाहीत सर्वांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, असे म्हणणे निदर्शनकर्त्यांनी मांडले.आंदोलकांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, कोणीही मेट्रोच्या विरोधात नाही. प्रत्येकाला झाड लावण्यासाठी बाग नाही. त्यामुळे बिग बीच्या या वक्तव्यामुळे अज्ञान आणि विशेषाधिकार दिसून येतात. मुंबईत खुल्या मोकळ्या जागा आहेत आणि आरे त्यापैकी एक आहे. म्हणूनच हे जतन करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. एक बाग जंगलाची जागा घेऊ शकत नाही. या वेळी आम्ही त्यांना आरेला भेटायला बोलावले आहे. एक आदरणीय आणि प्रभावशाली नागरिक म्हणून आम्ही बिग बी यांच्याकडून सदर विषय समजावून घेऊन यावर मार्ग काढल्यास तो मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा विजय असेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी ट्विटरवरून मुंबई मेट्रोच्या सेवेचे कौतुक केले आहे. अमिताभ यांनी मेट्रो सेवा ही कशी अधिक कार्यक्षम आणि सोईस्कर आहे त्यांनी नमूद केले होते.
‘बिग बी’च्या घराबाहेर निदर्शने, ‘आरे वाचवा’चे केले समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:46 AM