Join us

औषधांसाठी बाहेरचा रस्ता, उपलब्ध साठा किती दिवस पुरेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 5:23 AM

नांदेड  येथील शासकीय रुग्णालयात २४ तासातील रुग्णांच्या मृत्यूच्या सत्रामुळे औषधांची टंचाई आणि पुरवठ्याचा मुद्दा समोर आला आहे.

मुंबई : नांदेड  येथील शासकीय रुग्णालयात २४ तासातील रुग्णांच्या मृत्यूच्या सत्रामुळे औषधांची टंचाई आणि पुरवठ्याचा मुद्दा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील औषधांच्या स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये बहुतांश ठिकाणी औषधे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.

औषधांचा तुटवडा

वर्धा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अकरा शासकीय रुग्णालयांत कफ सिरप, विविध ॲन्टीबायटीक आणि ऑईलमेंटचा तुटवडा असून अवघे पंधरा दिवस पुरेल इतकाच औषधसाठा शिल्लक आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती दिवसांचा साठा

९० दिवस : नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग

६० दिवस : अमरावती, बुलढाणा, वाशिम, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, सातारा, पुणे.

३० दिवस : अकोला, चंद्रपूर, बीड, जालना, जळगाव, कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी.

१५ दिवस : यवतमाळ, वर्धा, छत्रपती संभाजीनगर.

०८ दिवस : परभणी

०४ दिवस : धाराशिव

हाफकिनकडून पुरवठाच नाही

नागपूर/यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हाफकिनकडून अद्यापही औषध पुरवठा झाला नाही. गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीकडून खरेदी करण्यात आलेल्या ७ कोटींची औषधी व स्थानिक पातळीवर खरेदी केलेली १ कोटी ६८ लाख रुपयांच्या औषधांमुळे सध्यातरी औषधांची स्थिती भक्कम आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या १३ कोटींमधून औषधी खरेदीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यवतमाळमध्येही १ कोटींची तरतूद करत औषधी खरेदी सुरू केली.