वडाळा बलात्काराविरुद्ध भक्ती पार्क रहिवाशांचा उद्रेक
By admin | Published: April 28, 2015 01:07 AM2015-04-28T01:07:39+5:302015-04-28T01:07:39+5:30
पाच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार होण्याच्या घटनेला सात दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही.
मुंबई : पाच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार होण्याच्या घटनेला सात दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी आज भक्ती पार्क येथे रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावर तासभर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
आईच्या सांगण्यावरून मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही चिमुरडी शेजारीच असलेल्या दुकानात सामान खरेदीसाठी गेली होती. याच दरम्यान एका अनोळखी इसमाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत जवळ बोलावले. त्यानंतर या मुलीला घेऊन हा आरोपी एका निर्जन ठिकाणी गेला. या ठिकाणी मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने पळ काढला. मुलगी रडत असल्याने तिचा आवाज ऐकून परिसरातील एका इसमाने तिच्याकडे धाव घेतली. त्यानंतर या मुलीला पोलिसांनी सायन रुग्णालयात दाखल केले. सध्या या मुलीवर उपचार सुरू असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
याबाबत वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. मात्र घटनेला सात दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही. आरोपीला तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी आज काही रहिवाशांनी वडाळा आरटीओबाहेरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको केला. पाऊण तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत आंदोलनकर्त्यांना बाजूला करून हा मार्ग मोकळा केला, मात्र तोपर्यंत वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. (प्रतिनिधी)