Join us

कोरोनाचा प्रकोप; अंत्यसंस्कारावरच पालिकेचे कोट्यवधी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या दीड वर्षापासून मुंबई महापालिका कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत असून, कोरोनाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून मुंबई महापालिका कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत असून, कोरोनाला थोपविण्यात प्रशासनाला यश येत आहे. मात्र, हे करताना महापालिकेला विविध घटकांमागे पाण्यासारखा पैसा ओतावा लागला असून, नुसत्या कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबई महापालिकेने दीड एक वर्षात कोट्यवधी पैसा खर्च केला आहे. सूत्रांकडील माहितीनुसार, एका कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुमारे साडेसहा हजार रुपये खर्च केला जात असून, या पलीकडील खर्चाची मोजदाद झाली तर हा एकूण खर्च कोट्यवधीचा आहे.

मुंबई महापालिकेडून मृतदेहावरील अंत्यसंस्काराकरिता ३०० किलो लाकडे मोफत दिली जातात. ३०० किलोवर अधिक लाकडे लागली तर त्याचे पैसे आकाराले जातात. बहुतांशी कोरोना मृतदेहांवर विद्युत दाहिनीतदेखील अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले जात असतानाच अनेक ठिकाणांहून विद्युत दाहिन्या काही कारणांमुळे बंद पडू लागल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, असे स्वाभिमानी भारतीय पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश कुराडे यांनी सांगितले.

मुंबईतल्या बहुतांश स्मशानभूमीत विद्युत दाहिन्या नाहीत. सुरुवातीला कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर विद्युत दाहिन्यांमध्ये अंत्यसंस्कार होत असले तरी आता लाकडांचाही वापर केला जात आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी कोरोना मृतदेहांवरील अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमीमधील कर्मचारी पीपीई किट घालत होते. मात्र आता पीपई किट घातले जात नाही. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात आले आहेत. त्यांना अठरा हजार रुपये पगार दिला जातो. मात्र, कंत्राटदाराकडून त्यांना एवढा पैसा दिला जात नाही. अठरा हजारांतील जेमतेम आठ हजार कंत्राटी कामगारांना दिले जातात.

लाकूड ८ रुपये ५० पैसे किलो

मुंबई महापालिका मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी ३०० किलो लाकूड देते. हे लाकूड साडेआठ रुपये किलो आहे. मात्र, हे लाकूड मोफत दिले जाते. ३०० किलोवर लाकूड लागले तर त्याचे पैसे आकारले जातात. एक किलो लाकडाला साडेआठ रुपये धरले, तर ३०० किलो लाकडाचे अडीच हजार रुपये होतात.

पीपीई किटची किंमत १ हजार ५००

कोरोना रुग्णाच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी किमान ३ कामगार स्मशानभूमीत असतात. या सगळ्यांनी पीपीई किट घातलेले असते. वापरा आणि फेकून द्या प्रकारातील या एका किटची किंमत पाचशे या प्रमाणे तीन पीपीई किटची किंमत दीड हजार रुपये होते.

लेबर चार्ज २ हजार ५००

स्मशानभूमीत काम करणाऱ्या एका कामगाराचा लेबर चार्ज हा आठशे रुपये आहे. तीन कामगारांचे एकूण २ हजार ४०० रुपये झाले. यात पुन्हा देखभाल, दुरुस्ती खर्च धरल्यास हा खर्च २ हजार ५०० होईल.

एकूण ६,५०० रुपये

लाकूड, पीपीई किट, लेबर चार्ज असे अनेक घटक पकडता एका कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून सुमारे ६ हजार ५०० रुपये खर्च केले जात आहेत. आता अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत दाखल होत असलेले मृतदेह हे काळ्या पिशवीत पॅक होऊन येत असल्याने अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी पीपीई किट घालत नाहीत, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले.

व्यवस्थापन संवेदनशीलपणे

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविडबाधित रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यावर योग्यप्रकारे अंत्यसंस्कार व्हावेत, यादृष्टीने महापालिकेने स्मशानभूमी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली गेल्यावर्षीपासूनच कार्यान्वित केली आहे. त्याचबरोबर दफनभूमीतील अंत्यसंस्काराबाबतही महापालिका सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन संवेदनशीलपणे करीत आहे.

देखरेख - रखरखाव – परीरक्षण

स्मशानभूमीमध्ये येणाऱ्या मृत व्यक्तीच्या आप्तांची गरज लक्षात घेऊन सदर ठिकाणी बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, हातपाय धुण्यासाठी पाणी, शौचालय, आदी सेवा-सुविधा देखील देण्यात येतात, तर पारंपरिक पद्धतीने दहन करण्यासाठी जळाऊ लाकडेदेखील उपलब्ध करून दिली जातात. या स्मशानभूमीतील वातावरण अधिकाधिक स्वच्छ राहावे, याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जाते. तसेच स्मशानभूमी परिसरात देण्यात येणाऱ्या सेवासुविधा नियमितपणे मिळाव्यात, यासाठी सुयोग्य देखरेख - रखरखाव - परीरक्षणही सातत्याने केले जाते.

विद्युत किंवा गॅस दाहिनींमध्ये २४ तासांत ८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

विद्युत वा गॅस दाहिनींमध्ये एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सदर संयंत्र काही कालावधीसाठी बंद ठेवले जाते, तर कधी आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ते बंद ठेवावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता एका विद्युत वा गॅस दाहिनींमध्ये २४ तासांत साधारणपणे ८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकतात.

२४ तासांत ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची क्षमता

पारंपरिक पद्धतीनुसार जळाऊ लाकूड वापरून अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिका क्षेत्रात प्रत्येक चितास्थानाची कमाल क्षमता २४ तासांत साधारणपणे ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे.

चाैकट

- २४ तासांत १ हजार ४५८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची क्षमता.

- मुंबई महापालिकेद्वारे ४६ ठिकाणी पारंपरिक स्मशानभूमींसह विद्युत वा गॅस दाहिनी असणाऱ्या स्मशानभूमी आहेत.

- पारंपरिक पद्धतीने दहन संस्कार करण्यासाठी ४६ ठिकाणी २१९ चितास्थाने आहेत.

- ११ ठिकाणी विद्युत वा गॅस दाहिनी असून, तिथे १८ शवदाहिनी आहेत.

- एकूण २३७ चितास्थाने असून, यांची एकत्रित कमाल क्षमता २४ तासांत १ हजार ४५८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे.

---------------

कोरोना

२४ तासांत बाधित रुग्ण - ६७३

२४ तासांत बरे झालेले रुग्ण - ७५१

बरे झालेले एकूण रुग्ण - ६८०००९

बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९५%

एकूण सक्रिय रुग्ण- १५७०१

रुग्ण दुपटीचा दर- ५४३ दिवस

कोविड वाढीचा दर (१ जून ते ७ जून) - ०.१२ %

....................................