आरोग्य सचिवांची माहिती
राज्यातील रुग्णवाढ ही कोरोनाची दुसरी लाट नव्हे
आरोग्य सचिवांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील आठवड्यापासून राज्यासह मुंबई दैनंदिन कोराेना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या वाढीनंतर सर्व स्तरांवरील यंत्रणा सतर्क झाली असून, संसर्ग नियंत्रणासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, राज्यातील रुग्णवाढ ही काेराेनाची दुसरी लाट नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
राज्यासह मुंबईत झालेली रुग्णवाढ स्थानिक पातळीवरील असल्याचे आरोग्य विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सहवासितांचा शोध आणि निदान या दोन सूत्रांद्वारे हा संसर्ग आटोक्यात आणता येऊ शकतो, अशी माहिती डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली. चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे पुढील दोन आठवड्यांपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख वाढताना दिसून येईल. कोणत्याही साथीच्या आजारात अशा प्रकारचे चढ-उतार येत असतात, असेही त्यांनी नमूद केले.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, शहर, उपनगरात मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू झाल्यामुळे लोकल सेवेच्या मार्गावरील गर्दीही वाढली आहे. त्यामुळे केवळ यंत्रणांनी संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करून उपयोग नाही, तर त्यासाठी सर्वसामान्यांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. याकरिता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणे गरजेचे आहे.
.......................................