साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:07+5:302021-07-08T04:06:07+5:30
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. मात्र, साथीच्या आजारांचे रुग्ण मात्र वाढताना दिसत आहेत. ...
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. मात्र, साथीच्या आजारांचे रुग्ण मात्र वाढताना दिसत आहेत. गेल्या महिनाअखेरीस मलेरियाचे २७९, गॅस्ट्रोचे १४९, डेंग्यूचे सहा आणि लेप्टोचे १३ रुग्ण आढळून आले आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असते. यामध्ये मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आणि गॅस्ट्रो या आजारांवर वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू संभवतो. त्यामुळे साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेमार्फत विशेष खबरदारी घेतली जाते. गेल्यावर्षी कोविडकाळात महापालिका आणि खासगी रुग्णालयांमधील खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव होत्या. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीपासून केईएम, नायर, सायन, कूपर व अन्य पालिका रुग्णालयांमध्ये १५०० खाटा साथीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.
पालिकेच्या उपाययोजना
- डासांमुळे मलेरिया व डेंग्यूसारखे आजार संभवतात. त्यामुळे डासांची उत्पत्तीस्थळे शोधून नष्ट करण्याची कार्यवाही कीटकनाशक विभागामार्फत केली जाते.
- गॅस्ट्रो नियंत्रण ठेवण्यासाठी दूषित पाण्याच्या तक्रारी असलेल्या भागांतील पाण्याची नियमित तपासणी करणे.
- पाण्यातील प्राण्यांच्या मलमूत्रापासून लेप्टोचा संसर्ग होऊ शकतो. यासाठी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यावर भर दिला जातो.
जून महिन्यातील आकडेवारी...
आजार...२०१९..२०२०....२०२१
मलेरिया...३१३...३२८...२७९
लेप्टो..०५....०१.....१३
डेंग्यू ...०८....०४...१०
गॅस्ट्रो.....-.....४०...१४९