स्पर्धा परीक्षार्थींच्या संतापाचा उद्रेक, राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:24 AM2021-03-12T06:24:50+5:302021-03-12T06:25:21+5:30

ठिकठिकाणी चक्का जाम; ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने राज्यभर निदर्शने

Outbursts of anger among competition examinees | स्पर्धा परीक्षार्थींच्या संतापाचा उद्रेक, राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर

स्पर्धा परीक्षार्थींच्या संतापाचा उद्रेक, राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर

Next
ठळक मुद्देनागपूरसह विदर्भात रास्ता रोको; अमरावतीत सौम्य लाठीचार्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/नागपूर/औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)  १४ मार्चला होणारी राज्यसेवा  पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा अचानक रद्द केल्याने राज्यभर परीक्षार्थीं रस्त्यावर उतरले. त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. गुरुवारी दुपारी पुण्यातील नवी पेठेतील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर तरुणांनी रास्ता रोको आंदोलन करून शासनाविरोधात रोष व्यक्त केला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनस्थळी ठिय्या दिला होता. पोलिसांनी रात्री त्यांना ताब्यात घेतले.  

कोल्हापुरात रास्ता रोको
विद्यार्थ्यांनी सायबर चौक आणि बिंदू चौकात रास्ता रोको, ठिय्या आंदोलन केले. राज्य सरकार  आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात घोषणा देत जोरदार निर्दशने केली.  राजारामपुरी, सायबर चौक परिसरातील खासगी अभ्यासिका, क्लासेसमधील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांतील असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी दुपारी साडेचारच्या सुमारास सायबर चौकामध्ये आले.  सुमारे दीड तास त्यांचे आंदोलन सुरू होते. सांगलीत आंदोलक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. 

नागपूरसह विदर्भात रास्ता रोको; अमरावतीत सौम्य लाठीचार्ज

राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात नागपुरातील विद्यार्थ्यांनी सक्करदरा चौकात गुरुवारी सायंकाळी निदर्शने केली. निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाची हाक देण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. पुण्यातील आंदोलनाचे वृत्त कळताच सुमारे ४०० ते ५०० विद्यार्थी सक्करदरा चौकात एकत्र येऊन अकस्मात आंदोलन सुरू केले. सुमारे तासभर निदर्शने सुरू होती. नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन निवळले. 

अमरावती येथील पंचवटी चौकात गुरुवारी दुपारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी २० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पोलीस व्हॅनमधून विद्यार्थ्यांना नेले जात असताना माजी कृषिमंत्री अनिल बोंडे घटनास्थळी पोहोचले. विद्यार्थ्यांना व्हॅनमधून बाहेर काढा, असे बोंडे म्हणाले. यावरून ठाणेदार आसाराम चोरमले व बोंडे यांच्यात बाचाबाची झाली. 

वर्ध्यातही विद्यार्थी आक्रमक झाले. जमावबंदीचा आदेश जुगारुन शेकडो विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येऊन आंदोलन केले. दोन-अडीच तासानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळी निदर्शने केली. गडचिरोली जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले. 

औरंगाबाद, लातूरला ठिय्या आंदोलन

n औरंगाबादला औरंगपुऱ्यातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. जवळपास चारशे ते पाचशे विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते.
n पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाला. त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु ते अधिकच आक्रमक झाले. 
n लातूरमध्ये बार्शी रोडवरील ईदगाह मैदानासमोर तरुणांनी चक्काजाम आंदोलन केले. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा घेतल्या जात आहेत. लोकसेवा आयोगाची परीक्षा का रद्द केली जात आहे, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि परभणी येथेही आंदोलन करण्यात आले.  
 

 

Web Title: Outbursts of anger among competition examinees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.