लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांना धाडलेल्या वाढीव वीज बिलांविरोधात जनता आजही आक्रमक आहे. वाढीव वीज बिलाबाबत दिलासा देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले असले तरी अद्याप त्याबाबत काहीच पावले उचलली गेलेली नाहीत. दुसरीकडे वीज बिल भरले जात नसल्याने वीज कंपन्यांनी ग्राहकांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. या विरोधात शुक्रवारी भांडूप, कांदिवली आणि वडाळा येथे वीज कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत ग्राहकांनी रोष व्यक्त केला.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांचे मीटर रीडिंग कोरोनामुळे घेण्यात आले नाही. त्यामुळे वीज कंपन्यांनी ग्राहकांना सरासरी वीज बिले धाडली. त्यात मे महिन्यात विजेचे दर वाढले. त्यामुळे या पुढील महिन्यांत आलेली बिले वाढीव दराने आली. शिवाय लॉकडाऊनमुळे विजेचा वापर वाढल्याने साहजिकच विजेची बिलेही वाढली. मुंबई शहरात बेस्ट, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात अदानी, टाटा तर भांडूप आणि मुलुंडमध्ये महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. या चारही वीज कंपन्यांनी धाडलेल्या बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. ७५ लाख ग्राहकांना वीज बिल वसुलीसाठी नोटीसही दिल्या. कोरोना काळात म्हणजे मार्च महिन्यांपासून अनेकांच्या नोकरी, व्यवसायावर गदा आल्याने किमान माणसुकीच्या नात्याने तरी ग्राहकांना दिलासा देण्यात यावा, असे म्हणणे विविध राजकीय पक्षांसह वीज ग्राहक संघटनांनी मांडले. दरम्यानच्या काळात सरकारसोबत झालेल्या बैठकीत वीज ग्राहकांना दिलासा दिला जाईल, असेही आश्वासन देण्यात आले. मात्र, खासगी वीज कंपन्यांनी वीज बिल भरले जात नसल्याने नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. याचे उत्तर मुंबईकरांनी आंदोलनाच्या माध्यमातून दिले असून, भाजपतर्फे वीज कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर रोष व्यक्त केला.