बिरवाडी : महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागातर्फे आयुक्तालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत रायगड जिल्हयातील अंगणवाडयांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. हे वाटप कालबाह्य झाल्याचा प्रकार बिरवाडीमध्ये बुधवारी उघडकीस आला आहे.कुपोषणमुक्त महाराष्ट्र करण्याच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या पोषण आहाराचे वाटप गरोदर माता, बालक शिशू यांना करण्यात येते. मात्र हे पोषण आहाराचे पदार्थ उत्पादनाच्या तारखेपासून कालबाह्य झाल्यानंतर देखील वाटप केले जात असल्याचा प्रकार बिरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन बागडे यांनी उघडकीस आणला आहे.पिकअपमधून (एमएच ०६/एजी/७७३१) कालबाह्य झालेल्या पोषण आहाराचे पदार्थ वाटप केले जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सचिन बागडे, बिरवाडीचे माजी सरपंच माधव बागडे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेचा पंचनामा करून बिरवाडी ग्रामपंचायतीतर्फे महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात येणार आहे. या घटनेची माहिती मिळताच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी एस.एस.माने यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोषण आहार वाटपाचे काम राजस्थान येथील खाजगी महिला उद्योग समूहाला दिले असून आयुक्तालयामार्फत या पोषण आहाराच्या पदार्थाचे वाटप होत असते. त्यामुळे कालबाह्य झालेल्या वस्तू अंगणवाडी सेविकांनी वाटू नयेत अशा सूचना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या घटनेने शासनाच्या संबंधित विभागाच्या बेजबाबदारपणामुळे गरोदर माता, बालक यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (वार्ताहर)
कालबाह्य पोषण आहाराचे वाटप
By admin | Published: July 18, 2014 12:45 AM