निधीवाटपावर ‘बाहेरचा कंट्रोल’ भाजपाला अमान्य
By admin | Published: March 31, 2016 02:35 AM2016-03-31T02:35:45+5:302016-03-31T02:35:45+5:30
विकास निधीचे वाटप पक्षश्रेष्ठींच्या निकषानुसार होत असल्याच्या खळबळजनक विधानामुळे महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असून, या विधानावरून विरोधी
मुंबई : विकास निधीचे वाटप पक्षश्रेष्ठींच्या निकषानुसार होत असल्याच्या खळबळजनक विधानामुळे महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असून, या विधानावरून विरोधी पक्षांसह मित्रपक्ष भाजपानेही शिवसेनेला कोंडीत पकडले आहे़ विरोधकांनी स्थायी समिती व महापौर दालनाबाहेर निदर्शने केली़ निधीच्या वाटपावर असा बाहेरचा ‘रिमोट कंट्रोल’ अमान्य असल्याची भूमिका भाजपाने मांडली आहे.
या वर्षी महापौरांना मंजूर झालेल्या ५० कोटी रुपये निधीतून ८० टक्के रक्कम आपल्या पक्षाकडे वळवित, शिवसेना-भाजपा युतीने विरोधकांच्या तोंडाला पाने पुसली. मात्र, यावर विरोधकांनी महापौरांना जाब विचारताच, पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांनी ठरविलेल्या निकषानुसारच वाटप झाल्याची कबुली देऊन, महापौर आंबेकर यांनी शिवसेनेला गोत्यात आणले़ त्यांच्या या विधानाचे भांडवल करीत विरोधी पक्षांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज गोंधळ घातला़
निधीवाटपावर ‘बाहेरचा कंट्रोल’ हा सभागृहाचा अवमान आहे़ या प्रकरणी महापौरांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी
केली़ या गोंधळातच स्थायी
समितीचे कामकाज उरकून बैठक गुंडाळण्यात आली़ यामुळे संतप्त काँगे्रस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर दालनाबाहेर निदर्शने करण्यास सुरुवात केली़ मात्र, महापौर आपल्या दालनात नसल्यामुळे विरोधकांना घोषणाबाजीवरच समाधान मानावे लागले़ (प्रतिनिधी)
शिवसेनेकडून बचाव
महापौर स्नेहल आंबेकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या ाचावासाठी पुन्हा एकदा शिवसेनेच्या शिलेदारांना कसरत करावी लागत आहे़ पक्षश्रेष्ठींच्या निकषानुसार
निधी वाटप होत असल्याचा कबुली जबाब महापौरांनी दिल्यानंतर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी महापौरांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात येत असल्याचे सांगून त्यांची बाजू सावरून धरली. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे स्वपक्षीय नगरसेवकांना सूचना करू शकतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले़
निधीवाटपात उद्धव ठाकरेंचा हस्तक्षेप
गेल्या वर्षी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या निधीवाटपाचे स्टिंग करून, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला अडचणीत आणले होते़ त्याचे तीव्र पडसाद उमटून शिवसेनेची लाज गेली होती़ अखेर या वर्षी निधी मंजूर झाला़ मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, गत वर्षी कोणत्या नगरसेवकाला किती निधी मिळाला, त्याने तो कुठे व किती खर्च केला, याची माहिती मागविली होती़ त्यांच्या सूचनेनुसार, निधी वाटला गेल्याचे महापौरांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे़
प्रकरणाचा शोध लागावा
महापौर हे सर्वोच्च पद आहे़ त्यात कोणाचा हस्तक्षेप योग्य नाही. निधीवाटपावर असा बाहेरचा कंट्रोल असल्यास तो आम्हाला मान्य नाही़ या प्रकरणाचा शोध लागणे गरजेचे आहे.
- मनोज कोटक, गटनेते, भाजपा