मुंबई : मुंबई विद्यापीठाचे आॅनलाइन मूल्यांकन आणि मूल्यांकन करणाºया कंपनीवरून मोठ्या प्रमाणात आरडाओरड होत आहे. निकालाच्या लेटमार्कला मेरिट ट्रॅक कंपनी जबाबदार असल्याची टीका होत आहे. असे असतानाही आतापर्यंत मूल्यांकनासाठी विद्यापीठाने तब्बल १ कोटी १८ लाख रुपये कंपनीला दिल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.अभियांत्रिकीचे मूल्यांकन आॅनलाइन पद्धतीने होते, पण त्या कंपनीलाच कंत्राट न देता, विद्यापीठाने मेरिट ट्रॅक कंपनीला कंत्राट दिले. या कंपनीला कंत्राट देताना विद्यापीठाने नियम शिथिल केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. त्यामुळे विद्यापीठाचा या कंपनीवर वरदहस्त का, याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आॅनलाइन मूल्यांकन गोंधळामुळे विद्यापीठाचे निकाल चक्क सप्टेंबर महिन्यात जाहीर झाले.मुंबई विद्यापीठाने मेरिट ट्रॅक कंपनीवर किती पैसे खर्च केले? या माहितीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी अर्ज केला होता. या वेळी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार मेरिट ट्रॅक सर्व्हिस प्रा. लिमिटेड कंपनीने विद्यापीठाकडे आतापर्यंत दोन देयके सादर केली होती. एक देयक १८ मे रोजी सादर केले होते. त्याची रक्कम रुपये १ कोटी ४८ लाख ६३ हजार ७५० इतकी होती, तर दुसरे देयक दिनांक १६ आॅगस्ट रोजी सादर केले होते. त्या देयकाची रक्कम रुपये २ कोटी ६९ लाख २७ हजार ३५० इतकी आहे. या दोन्ही बिलांची एकूण रक्कम ४ कोटी १७ लाख ९१ हजार १०० रुपये इतकी आहे. एकूण रकमेपैकी विद्यापीठाने आतापर्यंत १ कोटी १८ लाख १७ हजार ४०४ इतकी रक्कम अदा केली असून, २ कोटी ९९ लाख ७३ हजार ६९६ रुपये इतकी रक्कम बाकी असल्याची माहिती पुढे आली आहे.मेरिट ट्रॅकमुळे विद्यापीठाची नाचक्की झाली आहे. यामुळे कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून दंड वसूल केला पाहिजे, पण विद्यापीठ त्यांनाच पैसे देत आहे. आता या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालून दंड वसूल करावा यासाठी गलगली यांनी राज्यपालांसह अन्य संबंधितांना पत्र लिहले आहे.>२ कोटी बाकीविद्यापीठाने आतापर्यंत १ कोटी १८ लाख १७ हजार ४०४ इतकी रक्कम कंपनीला अदा केली असून, सध्या त्यापैकी रुपये २ कोटी ९९ लाख ७३ हजार ६९६ रुपये इतकी रक्कम बाकी असल्याची माहिती पुढे आली आहे.
निकालाला लेटमार्क तरीही दिले १.१८ कोटी, मुंबई विद्यापीठाची कंपनीवर मेहेरनजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 6:16 AM