नाराज आयपीएस संजय पांडे यांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:06 AM2021-03-19T04:06:37+5:302021-03-19T04:06:37+5:30
नाराज आयपीएस संजय पांडे यांचा सरकारवर ''लेटर बाॅम्ब'' । * * * * * * * * * * ...
नाराज आयपीएस संजय पांडे यांचा
सरकारवर ''लेटर बाॅम्ब'' ।
* * * * * * * * * * * * * * * * * * * *ज्येष्ठता डावलून अन्याय करीत असल्याची व्यथा
* मुख्यमंत्र्यांना दिला शरद पवार यांच्या शब्दाचा हवाला
( फोटो-संजय पांडे)
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात मिळालेल्या जिलेटीन कांड्यांचा महाराष्ट्र पोलीस दलात मोठा 'स्फोट' होऊनही अद्याप सारे काही आलबेल झालेले नाही. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे हे नव्या फेरबदलात सरकारने पुन्हा आपल्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त करीत दीर्घ रजेवर गेले आहेत. त्याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहून व्यथा मांडली आहे.
सर्वात ज्येष्ठ असल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सद्यस्थितीत पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार आपल्याला द्यायला हवा होता. मात्र, सर्वात कमी दर्जाच्या ठिकाणी बदली करण्यात आल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने बुधवारी परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी 'होमगार्ड'मध्ये केली आणि तेथे कार्यरत असलेले पांडे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात बदली करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले पांडे तत्काळ रजेवर गेले आणि गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राची प्रत गृहमंत्री, गृह सचिवांनाही पाठविली. त्यामुळे या 'लेटरबाॅम्ब'चे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
१९८६च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले पांडे यांनी या पत्रात नमूद केले आहे की, गेल्या काही वर्षांपासून आपल्याला विनाकारण 'साईड पोस्ट' देऊन अन्याय केला जात आहे. आपणाला भेटून हा अन्याय सविस्तर मांडल्यावर आपण आश्वासन देऊनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश सिंग खटल्यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार पोस्टींग देण्याबाबत निर्देश दिले आहेत. मात्र, दुर्दैवाने त्याचे पालन केले जात नसल्याने आपले मानसिक खच्चीकरण केले जात आहे.
--------------------
देवेन भारती, पिपरी चिंचवड प्रकरणाचा कसून तपास
पांडे यांनी पत्रात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्यावरील गंभीर आरोप तसेच पिपरी चिंचवड आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीने बंद केलेल्या एका प्रकरणाचा तपास गृहमंत्र्यांनी आपल्याकडे सोपविला होता. चौकशी करण्यात परमबीर सिंग तसेच तत्कालीन डीजीपी सुबोध जायसवाल यांनी अनेक अडथळे आणले. मुख्य सचिव संजय कुमार यांनी चौकशी बंद करण्याबाबत फोनवरून सूचना दिल्या होत्या. तरीही त्या प्रकरणांचा निष्पक्षपाती तपास करून सरकारला अहवाल सादर केल्याने आपण व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझे कौतुक केले होते. प्रत्यक्षात मात्र माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आणि आपल्याला जाणीवपूर्वक नॉनकेडर पोस्ट दिल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
-------------
म्हणून पांडे दुर्लक्षित
कठोर शिस्तीचे म्हणून खात्यात परिचित असलेल्या पांडे यांनी २००२ साली राजीनामा देऊन परदेशात खासगी कंपनीत नोकरी पत्करली होती. मात्र, त्यांचा राजीनामा मुदतीत मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते पुन्हा सेवेत आले. सनदी अधिकाऱ्यांचा तेव्हापासून त्यांच्यावर आकस आहे.
* * *सन २०१४मध्ये वजन मापे विभागात नियंत्रक असताना बिल्डरांचे गैरव्यवहार उघडकीस आणल्यानंतर त्यांची होमगार्डला बदली करण्यात आली. त्यानंतर ४ वर्षांपूर्वी फडणवीस सरकारने डीजीचे प्रमोशन डावलल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन ते मिळविले होते.