Join us  

‘मेट्रो ३’च्या कारशेडप्रकरणी ‘आतले’ विरुद्ध ‘बाहेरचे’ वाद

By admin | Published: March 08, 2016 2:50 AM

‘मेट्रो ३’चे कारशेड गोरेगावातील आरेमध्येच उभारण्याबाबत निर्णय झाला असला, तरी ‘आतल्या’ आणि ‘बाहरेच्यां’मध्ये याबाबत वाद सुरूच आहे. या कारशेडला ‘सेव्ह आरे’ संघटनेने विरोध दर्शवला आहे.

मुंबई : ‘मेट्रो ३’चे कारशेड गोरेगावातील आरेमध्येच उभारण्याबाबत निर्णय झाला असला, तरी ‘आतल्या’ आणि ‘बाहरेच्यां’मध्ये याबाबत वाद सुरूच आहे. या कारशेडला ‘सेव्ह आरे’ संघटनेने विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे आरेमधील स्थानिक नागरिकांसह काही स्वयंसेवी संस्थांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. परिणामी, ‘मेट्रो ३’च्या आरेमधील कारशेडबाबत दोन विरोधी भूमिका असलेल्या गटांचा वाद आणखी चिघळला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन पर्यायाने सरकार यावर नक्की काय भूमिका घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.मागील आठवड्यात मंत्रालयात झालेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या बैठकीत कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी ‘मेट्रो ३’चे कारशेड आरेतच उभारण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. कांजूरमार्गमधील कारशेडच्या जागेचा प्रश्न सुटत नसल्याच्या कारणात्सव प्रकल्पाचे काम रखडत असल्याचे कारण पुढे करत, या संबंधीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या संदर्भातील अंतिम निर्णयाकरिता राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे म्हणणे आहे.वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले की, ‘मेट्रो ३’ च्या कारशेड संदर्भातील प्रकरण सध्या हरित लवादाकडे प्रलंबित आहे. असे असताना प्राधिकरणाने बैठक घेणेच चुकीचे आहे. जंगल तोडून कोणताही प्रकल्प उभा राहता कामा नये, असे आमचे सुरुवातीपासूनचे म्हणणे आहे. शिवाय आरेच्या कारशेडमुळे प्रकल्पाचे काम थांबलेले नाही, परंतु प्राधिकरण तसे असल्याचे भासवत आहे. प्रत्यक्षात मेट्रो कारशेड वगळता उर्वरित कारणांमुळे प्रकल्पाचे काम रखडलेले आहे. केवळ निधी लवकर मिळावा, म्हणून प्राधिकरणाकडून मेट्रो कारशेडच्या कामाची घाई केली जात आहे. ‘आरे’ येथील नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष सुनील कुमरे यांच्या म्हणण्यानुसार, ‘मेट्रो ३’ चे कारशेड आरेत होणार असेल आणि या निमित्ताने आदिवासी बांधवांना रोजगार मिळणार असतील, तर आम्ही प्राधिकरणाच्या निर्णयाचे स्वागत करतो. शिवाय आरेतील मेट्रोच्या निमित्ताने येथील पायाभूत सेवासुविधांमध्ये भर पडणार असेल, तर आमचा मेट्रोला विरोध नाही. ‘मेट्रो ३’ च्या आरेमधील कारशेडला आमचा किंवा स्थानिकांचा विरोध नाही. ज्यांनी कारशेडला विरोध केला आहे, ते लोक आरेबाहेरील आहेत.जनआधार प्रतिष्ठानचे नीलेश धुरी यांनी सांगितले की, ‘मेट्रो ३’ च्या आरेमधील कारशेडसाठी वृक्षतोड होणार नसेल, तर आम्ही त्याचे स्वागत करतो, परंतु मेट्रोचे कारशेड आरेत बांधतेवेळी येथील आदिवासी बांधवांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. शिवाय या निमित्ताने मेट्रो आरेमध्ये दाखल होणार असेल आणि पायाभूत सेवा-सुविधांना चालना मिळणार असेल, तर नक्कीच आम्ही प्रकल्पाबाबत सकारात्मक आहोत. (प्रतिनिधी)एमएमआरडीए समितीच्या शिफारशी : मेट्रोची मुख्य कारशेड कांजूरमार्ग येथे उभारावी. छोटी कारशेड आरेत उभारण्यात यावी. सीप्झ ते कांजूर हा मेट्रोमार्ग ‘मेट्रो ३’ला जोडण्यात यावा. कांजूरमधील जागेचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा आरेतच ‘डबलडेकर’ कारशेड उभारा. महत्त्वाचे म्हणजे, तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या मोबदल्यात दुप्पट वृक्ष लावावेत.