संतोष आंधळेमुंबई : घरातलं कोणी हॉस्पिटलला ॲडमिट असलं की, घराचं सगळं वेळापत्रक बिघडतं. सगळं घर रुग्ण आणि हॉस्पिटलभोवती फिरत राहतं. त्यामुळे कोणाला जेवणाची भ्रांत राहात नाही. नातेवाइकांना तर नाहीच. हीच अडचण ओळखून सुरू करण्यात आलेला अन्नदानाचा उपक्रम आता मोठा झाला आहे. ‘दोन घास विथ आर्य’ हा तो उपक्रम. या माध्यमातून केईएम रुग्णालयाबाहेर सकाळ-सायंकाळ दररोज ३०० जणांना अन्नदान केले जाते.
विक्रांत आणि शीतल भाटकर या दाम्पत्याचा आर्य नावाचा मुलगा आठ वर्षांपूर्वी गंभीर आजारामुळे जग सोडून गेला. त्याच्या स्मरणार्थ भाटकर दाम्पत्याने सात वर्षांपूर्वी ‘दोन घास विथ आर्य’ ही संस्था सुरू केली. सुरुवातीला ५० रुग्णांसाठी दररोज अन्न शिजवले जायचे व ते केईएम रुग्णालयात वितरित केले जायचे. विशेष म्हणजे या अन्नदानाच्या कामासाठी अनेक खासगी आणि सरकारी सेवेतील निवृत्त व्यक्ती येथे स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी येत असतात.
केईएम रुग्णालयाबाहेर रोज सकाळी साडेअकरा वाजता आणि सायंकाळी साडेसहा वाजता अन्न घेण्यासाठी रुग्णांच्या रांगा लागत असतात. मुंबईबाहेरून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी प्राधान्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला. मात्र, काहीजण मुंबईतीलही असतात. रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांना गेट पास दिला जातो. त्यावरून नातेवाईक कुठल्या भागातील आहेत, याची ओळख स्वयंसेवकांना होत असते. या उपक्रमाची दखल घेत अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत असून मुलाचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस या ठिकाणी काही वेगळे पदार्थ, फळे नातेवाइकांना स्वतः वाटप करत असतात.
राज्यात अन्य ठिकाणीही...
मुंबईव्यतिरिक्त अमरावती, रत्नागिरी, कळवा, कोल्हापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्येही रुग्णाच्या नातेवाइकांना एक वेळचे अन्न देण्याची सोय दोन घास विथ आर्य संस्थेतर्फे करण्यात आली आहे. टाटा रुग्णालयाच्या नातेवाइकांसाठी वडाळ्यात नाश्त्याची सोय करण्यात येते. शिवडी टीबी रुग्णालयातही या अशाच प्रकारची एक वेळेची सेवा देण्यात येते.
स्वयंसेवक काय करतात?
७१ वर्षीय चंपक पांचाळ रोज या ठिकाणी जेवण वाटण्यासाठी स्वयंसेवकाच्या भूमिकेत असतात, तर राष्ट्रीयीकृत बँकेतून निवृत्त झालेल्या महिला अधिकारी गीता अय्यर मालाडहून दर सोमवारी या ठिकाणी स्वयंसेविकेचे काम करण्यासाठी येत आहेत. आठ वर्षांपूर्वी आम्हाला आर्य गंभीर आजाराने सोडून गेला. त्याच्या स्मरणार्थ ही संस्था चालू करून दोन घास नावाचा ५० रुग्णांसाठी हा उपक्रम सुरू केला. त्यानंतर त्याची माहिती अनेक ठिकाणी पोहचली. रुग्णांच्या नातेवाइकांची संख्या वाढू लागली. आता केईएम रुग्णालयातच दोन वेळचे ३०० डबे होतात. तसेच इतर केंद्रांवरील असे एकूण दररोज १२०० डबे झाले आहेत. दानशूर व्यक्ती पुढे येतात संस्थेला मदत करतात. त्यातून हा उपक्रम सध्या सुरू आहे. एकूण ६० स्वयंसेवक या कामासाठी मदत करतात.
- शीतल भाटकर, संस्थापिका, विथ आर्य
डब्यात काय?
सर्वसाधारणपणे एका वेळच्या डब्यात तीन पोळ्या, भाजी, वरण, भात, केळे तर सायंकाळी पुलाव, दालखिचडी असते. सकाळच्या नाश्त्यातला नियमित पदार्थांसोबत चहा दिला जातो.