उत्कृष्ट तपासाची बुडालेली पदके मिळणार; गृहमंत्र्यांनी दिला न्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 08:58 AM2023-09-16T08:58:27+5:302023-09-16T08:59:02+5:30
Mumbai: २०२३ च्या उत्कृष्ट तपासाची गृहमंत्री पदके राज्याच्या गृहविभागाच्या लालफितीमुळे मिळाली नव्हती. ‘लोकमत’ने याबद्दल केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, २०२३ ची पदके २०२४ च्या पदकांसोबत जाहीर करण्यात येतील, असे केंद्रीय गृहविभागाने कळविले आहे.
- डॉ. खुशालचंद बाहेती
मुंबई - २०२३ च्या उत्कृष्ट तपासाची गृहमंत्री पदके राज्याच्या गृहविभागाच्या लालफितीमुळे मिळाली नव्हती. ‘लोकमत’ने याबद्दल केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, २०२३ ची पदके २०२४ च्या पदकांसोबत जाहीर करण्यात येतील, असे केंद्रीय गृहविभागाने कळविले आहे.
१२ ऑगस्ट २०२३ रोजी देशभरातील १४० अधिकाऱ्यांना २०२३ ची उत्कृष्ट तपासाची गृहमंत्री पदके जाहीर झाली. त्यात महाराष्ट्राला एकही पदक नव्हते. महाराष्ट्रासाठी ११ पदके राखीव असताना एकही पदक न मिळाल्याबद्दल लोकमतने वृत्त दिले व पोलिस दलात खळबळ उडाली. राज्य पोलिसांचे प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने त्रुटी काढत परत केले व सुधारित मागितले. मात्र, राज्याच्या गृहविभागाने सुधारित प्रस्ताव पाठवलेच नाहीत व ११ अधिकाऱ्यांची पदके बुडाली.
‘लोकमत’ने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध करताच राज्य गुन्हे शाखेचे अप्पर महासंचालक प्रशांत बुरडे व अधीक्षक पल्लवी बारगे यांनी त्रुटींची पूर्तता करुन प्रस्ताव पाठविले व पाठपुरावा केला. मात्र पदके जाहीर झालीच नाहीत. लालफितीचा फटका पोलिस अधिकाऱ्यांना का बसावा, म्हणून ‘लोकमत’ने पुन्हा वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नेला. अमित शाह यांनी त्यात मार्ग काढण्याच्या दृष्टीने २०२३ ची पदके २०२४ च्या पदकांच्या यादीसोबत जाहीर करावीत, असे आदेश दिले. केंद्रीय गृहविभागाने तसे राज्य सरकारला कळवले आहे.