स्पर्धेत ३ रौप्य आणि एका कांस्य पदकाची केली कमाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत सहभागी झालेल्या चारही भारतीय विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत ३ रौप्य पदके आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. दि. १८ ते २३ जुलै दरम्यान पार पडलेली ही स्पर्धा यंदा ऑनलाईन पद्धतीने पार पडली असून, याचे यजमानपद पोर्तुगाल देशाकडे होते.
जगातील ७६ देशांमधल्या ३०४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आभासी पद्धतीने भाग घेतला होता. टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे राष्ट्रीय केंद्र असलेल्या होमी भाभा शास्त्रीय शिक्षण केंद्राकडून ही माहिती देण्यात आली आहे. या रौप्यपदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अंशुल सिवाच, धीरेन भारद्वाज, नमन सिंग यांचा समावेश आहे तर स्वराज नंदी याने कांस्य पदकाची कमाई केली आहे.
होमी भाभा शास्त्रीय शिक्षण केंद्र (एचबीसीएसई) हे टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे राष्ट्रीय केंद्र देशातील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र तसेच ज्युनियर शास्त्र या विषयांतील ऑलिम्पियाड स्पर्धेच्या आयोजनासाठी नोडल केंद्र म्हणून काम करते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या केंद्राकडे आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजक आणि एचबीसीएसई यांच्या दूरदृश्य परीक्षणाखाली विद्यार्थ्यांनी आपापल्या घरातूनच या परीक्षा दिल्या आहेत. यातील सहभागी संघांची निवड फेब्रुवारी २०२१मध्ये झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात आली. एचबीसीएसईने आयोजित केलेल्या ऑनलाईन सत्रांमधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या आव्हानात्मक परिस्थितीतदेखील उत्तम सादरीकरण करत आपल्या विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दाखविण्याचा भारताचा लौकिक कायम ठेवला, त्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया एचबीसीएसईमधील शास्त्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेचे राष्ट्रीय समन्वयक प्रा. अन्वेष मझुमदार यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या चर्चांमध्ये प्रा. मोहन चतुर्वेदी (दिल्ली विद्यापीठ), प्रा. रेखा वर्तक (एचबीसीएसई, मुंबई), डॉ. राम कुमार मिश्रा (आयआयएसईआर, भोपाळ) आणि डॉ. शशिकुमार मेनन (टीडीएम प्रयोगशाळा, मुंबई) या चार परीक्षक सदस्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत माहिती आधारित परीक्षेमध्ये जागतिक उष्मावाढ आणि कोविड १९ यांसारख्या सध्याच्या समस्यांसह जीवशास्त्राच्या सर्व क्षेत्रांवर आधारित आव्हानात्मक प्रश्नांचा समावेश होता, असेही प्रा. अन्वेष मझुमदार यांनी सांगितले.