ओवेसींची गर्दन कायद्याने उडवायला हवी - उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
By admin | Published: March 17, 2016 08:54 AM2016-03-17T08:54:34+5:302016-03-17T09:07:00+5:30
आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी ‘भारतमाता की जय’ असे म्हणणार नाही अशी बांग ओवेसीने ठोकली, खरं तर अशा लोकांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी ‘भारतमाता की जय’ असे म्हणणार नाही अशी बांग ओवेसीने ठोकली, खरं तर अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू न लावता त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ओवैसींचा समाचार घेतला. 'सामना'च्या अग्रलेखातून ओवेसींवर कडाडून टीका करण्यात आली असून ' जे भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा, त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या' अशी मागणीही उद्धव यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात उदगिर येथे झालेल्या सभेत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी 'कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून देशात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असून काल विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ओवेसींवर टीकास्त्र सोडले असून भारतमातेच्या पाठीवर वार करून हे महाशय स्वत:ला हिंदुस्थानचे नागरिक म्हणवून घेत असतील तर त्यांच्या माथेफिरूपणावर कायदेशीर इलाज करणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे:
- आजच्या काळातील मुस्लिमांचे स्वयंभू पुढारी बनलेल्या ओवेसीसारख्या मुसलमानांना ‘भारतमाता की जय’ म्हणायला यातना होत आहेत. तिरंग्याचा अनवधानाने अपमान झाला म्हणून गुजरातमध्ये हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला व तो आजही तुरुंगात आहे. महाराष्ट्रात येऊन असदुद्दीन ओवेसीने भारतमातेचा अपमान करून देशद्रोहच केला नाही काय? आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी ‘भारतमाता की जय’ असे कधीच बोलणार नाही अशी बांग ओवेसीने ठोकली. खरे म्हणजे अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू कसला लावता? त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी.
- महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे राज्य व मुख्यमंत्री आहे तरी लातुरात भारतमातेचा अपमान होऊनही ओवेसी लातुरातून सहीसलामत सटकलाच कसा याचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांना द्यावेच लागेल. महाराष्ट्रात देशद्रोहाचा गुन्हा करून ओवेसी सरकारवर थुंकून सहीसलामत बाहेर पडतो. ‘‘मी जरी हिंदुस्थानात राहत असलो तरी ‘भारतमाता की जय’ असे म्हणणार नाही. कारण घटनेत किंवा कुठल्याही कायद्यामध्ये ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा लिहिलेली नाही’’ अशी अकलेची दारू ओवेसीने उडवली आहे. भारतमातेच्या पाठीवर वार करून हे महाशय स्वत:ला हिंदुस्थानचे नागरिक म्हणवून घेत असतील तर त्यांच्या माथेफिरूपणावर कायदेशीर इलाज करणे गरजेचे आहे. त्यांना ‘वंदे मातरम्’ म्हणायचे नाही, कारण मातृभूमी ही संकल्पना इस्लामला मान्य नाही. त्यांना समान नागरी कायदा नकोच. कारण ‘शरीयत’ कायदा इस्लामचा प्राण आहे व आता भारतमाता की जयही म्हणायचे नसेल तर मग भारतमातेला भार बनून येथे का राहत आहात, हा प्रश्न विचारला तर तुमच्या दाढ्या जळू नयेत.
- ‘भारतमाता की जय’ ही प्रेरणा आहे. राष्ट्रावरची श्रद्धा आहे व जात, धर्म न पाहता या श्रद्धा पाळायला हव्यात. मुसलमान समाजाची आज जी दुर्दशा झाली आहे व ‘इसिस’सारखे सैतान माजले आहेत त्यास ओवेसीसारख्यांची दळभद्री विचारसरणी कारणीभूत ठरत आहे. इस्लाम समाजाचा सर्वांगीण विचार करून त्याचा विकास घडवून आणणारे समाजसेवक व समाजसुधारक मात्र या समाजात झाले नाहीत. हिंदूंमधील सुधारकांनी आसुडाचे फटकारे मारून निद्रिस्त हिंदू समाजाला जागे करण्याचा जसा प्रयत्न केला तसा प्रयत्न मुसलमानांच्या बाबतीत होऊ शकला नाही व ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना मुसलमानांचे दुश्मनच ठरविण्यात आले.
- मुसलमानांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणायचे सोडून त्यांना देशापासून तोडले गेले. किंबहुना आपण भारतमातेचे कुणी लागत नसून हिंदुस्थानच्या पोटात ‘आपले स्वतंत्र राष्ट्र’ हे विष मुसलमानांच्या नसात भिनवण्याचे धर्मांध राजकारण वर्षानुवर्षे सुरू आहे. ओवेसीच्या ‘एमआयएम’ पक्षाचे आमदार वारीस पठाण यांनीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही अशी गरळ बुधवारी विधानसभेत ओकली. या आमदारमहाशयांना अधिवेशनकाळापर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने मंजूर केला ही गोष्ट चांगली झाली. अर्थात, त्यामुळे त्यांच्यासारख्या मुस्लिम धर्मांधांचे फूत्कार थांबतील असे नव्हे. ओवेसी यांनी भारतमातेचा अपमान केला आहे. आता ओवेसीच्या विरोधात मुसलमानांनी भारतमातेचा जयजयकार करावा. जे भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार बेशक काढून घ्या!