डेटिंग ॲपच्या सापळ्यात दोन कोटींहून अधिक गमावले; सायबर सुंदरीच्या माेहात अडकला व्यापारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 05:23 AM2024-09-16T05:23:27+5:302024-09-16T05:25:59+5:30
मुंबईतील व्यावसायिकाची अशाच प्रकारे डेटिंग ॲप्सवरील महिलांच्या मोहजालात अडकून दोन कोटींहून अधिक रक्कम गमावली आहे.
मुंबई : शेअर, क्रिप्टो ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार उघड होत असताना सायबर भामट्यांनी आता डेटिंग ॲप्सच्या आधारे शेअर ट्रेडिंगच्या मोहजालात अडकवून कोट्यवधी लाटण्याचे नवे गुन्हेगारी तंत्र अवलंबले आहे. मुंबईतील व्यावसायिकाची अशाच प्रकारे डेटिंग ॲप्सवरील महिलांच्या मोहजालात अडकून दोन कोटींहून अधिक रक्कम गमावली आहे.
भायखळ्यात मिठाई विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाची सायबर भामट्यांनी फसवणूक केली आहे. त्याने वैयक्तिक वापरासाठी टिंडर ॲप डाउनलोड केले. त्यानंतर त्याची १५ ते १७ मार्चदरम्यान कार्मेन अनिता नावाच्या महिलेशी ओळख झाली. त्यांच्यात व्हॉट्सॲपद्वारे संवाद सुरू झाला. २४ मार्चला अनिताने क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा तगादा त्यांच्या मागे लावला. पुढे एका वेबसाइटची लिंक पाठवून त्यावर क्रिप्टोमध्ये शेअर ट्रेडिंग करण्यास सांगितले. महिलेच्या सांगण्याप्रमाणे व्यापाऱ्याने ट्रेडिंग केले. सुरुवातीला १७ लाखांची गुंतवणूक केली. ट्रेडिंग खात्यावर १७ लाख जमा झाल्याने त्यांचा अनिता या कथित महिलेवर विश्वास बसला. त्यानंतर तिच्या प्रेमळ आग्रहानुसार त्यांनी पुन्हा गुंतवणूक केली.
पुढे आणखी एक महिला या प्रकारात पुढे आली. १३ एप्रिलला आणखी एका डेटिंग ॲपद्वारे शरिका सिंग या महिलेशी त्याची ओळख झाली. तिनेही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. तिच्या आग्रहानुसार, तक्रारदाराने ट्रेडिंग केले.
अनिता नि शरिकाचा प्रेमळ आग्रह
व्यावसायिकाने अनिताच्या आग्रहावरून एक कोटी २९ हजार ८४३ तर शरिकाच्या सल्ल्यानुसार एक कोटी १३ लाख ९८ हजार रुपयांची गुंतवणूक केली. या दोन्ही कथित महिलांनी तक्रारदार व्यापाऱ्याला जास्त धनलाभाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. मात्र, त्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला; पण ते मिळाले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेण्यावाचून त्यांच्यापुढे पर्याय उरला नाही.
गुन्ह्याची पद्धत
डेटिंग ॲपवरून सावज हेरायचे. ओळख करायची. त्याला मधाळ संवादात अडकवून बक्कळ नफ्याचे आमिष दाखवून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे आणि त्याचे पैसे हडप करायचे, अशी ही पद्धत आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाला शेअर गुंतवणुकीतून जास्त लाभ देण्याच्या मोहात अडकवून त्याचे दोन कोटी १४ लाख लाटल्याच्या गुन्ह्याचा सायबर पोलिस (मध्य विभाग) तपास करीत आहेत.
यापूर्वीचे गुन्हे
सप्टेंबर : बनावट शेअर ट्रेडिंग ॲपच्या जाळ्यात अडकून निवृत्त बँक कर्मचारी महिलेने दीड कोटी गमावले.
ऑगस्ट : शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा मिळविण्याच्या नादात एका बड्या कंपनीतील ५३ वर्षीय अधिकाऱ्याचे बँक खाते रिकामे झाले आहे. त्यांची दीड कोटींना फसवणूक झाली आहे.