आवडीच्या कॉलेजसाठी २ लाखांहून अधिक अर्ज; अखेर प्रवेशप्रक्रियेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 08:56 AM2023-06-09T08:56:30+5:302023-06-09T08:56:57+5:30
तीन विशेष फेऱ्या होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहावीचे निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाले. दरवर्षी मे महिन्यात ते जाहीर होतात, यंदा एक आठवडा उशीर झाला. त्यामुळे अकरावी प्रवेशदेखील उशिरा सुरू झाले. आतापर्यंत प्रवेश अर्ज नोंदणी केल्यानंतर नियमित तीन फेऱ्या होतील आणि त्यानंतर तीन विशेष फेऱ्या होणार आहेत.
मुंबई विभागात एकूण नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या सुमारे २ लाख ११ हजार ४२४ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ८२३ इतक्या विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झालेले आहेत. पैकी ८१ हजार ४५१ अर्जांची पडताळणी झालेली आहे, तर केंद्रांवरील खात्री पडताळणी झालेले अर्ज ६००८३ इतके आहेत. आतापर्यंत केवळ ३२ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज मागे घेतले. मुंबई विभागामध्ये एकूण विद्यार्थ्यांची क्षमता ३ लाख ७८ हजार ५५५ इतकी आहे, तर १ हजार १६ महाविद्यालये आहेत.
अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर महाविद्यालयांचा गेल्या वर्षीचा कटऑफ देण्यात आला आहे. यामध्ये दहावीतील गुण, आरक्षण, शाखा, माध्यम, पत्ता ही माहिती भरून कोणत्या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी पात्र आहेत याची माहिती घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे महाविद्यालय निवडणे आणखी सोपे जाणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रीयाही सुलभ असणार आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २ लाख १ हजार १९० जागा असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
पसंतीक्रम बदलता येणार
विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या कमी-अधिक प्रमाणात असलेली महाविद्यालयाची कटऑफ पाहून विद्यार्थ्यांनी कोणते महाविद्यालय प्राधान्यक्रमाने निवडायचे याचा निर्णय घ्यायचा आहे. दोन ते दहा पसंतीक्रम महाविद्यालय मिळाल्यास, प्रवेश घ्यायचा किंवा नाही हे ठरवता येईल. प्रवेश घेणार नाहीत असे विद्यार्थी पुढच्या प्रवेश फेरीसाठी पात्र ठरतात. दुसऱ्या किंवा त्याच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना आधी दिलेले पसंतीक्रम बदलता येऊ शकतात.
प्रवेशप्रक्रियेपूर्वी विद्यार्थ्यांनी ही कागदपत्रे बाळगावीत
ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचा प्रवेश अर्ज ऑनलाइन सादर करण्यापूर्वी जर विद्यार्थ्याला एखाद्या संवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्या विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या जातीचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अनु. जाती (SC) व अनु. जमाती (ST) व्यतिरिक्त इतर संवर्गातील विद्यार्थी एखादया संवर्गातील आरक्षणाचा लाभ घेत असतील तर अशा विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच जर विद्यार्थ्यांना विशेष (समांतर) आरक्षणाचा (विशेष आरक्षण म्हणजे बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांचे पाल्य, आजी - माजी सैनिकांचे पाल्य, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी किंवा पदक विजेते विद्यार्थी, राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त विद्यार्थी) लाभ घ्यावयाचा असले तर अशा विद्यार्थ्यांकडे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
१,१०१ कनिष्ठ महाविद्यालये
- मुंबई विभागासाठी अल्पसंख्याक गटासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण संख्या १ हजार १०१ आहे, तर भाषिक अल्पसंख्याक गटासाठी राखीव असलेल्या जागांचे प्रमाण अन्य गटांच्या तुलनेत अधिक आहे.
- धार्मिक अल्पसंख्याक आणि भाषिक - धार्मिक अल्पसंख्याक या दोन गटांच्या तुलनेत भाषिक अल्पसंख्याक गटासाठी १ लाख ४५ हजार ५२० जागा आहेत. भाषिक अल्पसंख्याक गटासाठी १०९ महाविद्यालये, तर धार्मिक अल्पसंख्याक, भाषिक - धार्मिक अल्पसंख्याक गटासाठी अनुक्रमे ७५ आणि १५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत.
- एच. एस. व्ही. सी. शाखेत भाषिक - धार्मिक अल्पसंख्याक गटासाठी केवळ एक कनिष्ठ महाविद्यालय असून, धार्मिक अल्पसंख्याक गटासाठी आठ, तर भाषिक अल्पसंख्याक गटासाठी १५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जागा आहेत.