मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 17:33 IST2024-06-12T17:31:50+5:302024-06-12T17:33:49+5:30
Mumbai Coastal Road Second Phase: मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावरुन मंगळवारी एका दिवसात तब्बल २० हजार ४५० वाहनांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास
मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावरुन मंगळवारी एका दिवसात तब्बल २० हजार ४५० वाहनांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. वेळेची बचत आणि टोल फ्री यामुळे मुंबईकरांची या मार्गाला चांगली पसंती मिळत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं उदघाटन करण्यात आलं. मरिन ड्राइव्ह ते हाजीअली असा दुसरा टप्प्याचा मार्ग आहे. हे अंतर पार करण्यासाठी आधी ४० मिनिटं लागत होती. पण कोस्टल रोडमुळे आता हा प्रवास अवघ्या ८ मिनिटांत करता येत आहे.
सध्या हा मार्ग फक्त सोमवार ते शुक्रवारसाठी सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत खुला करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी हा प्रवासासाठी बंद राहणार आहे. ऑक्टोबरपर्यंत हा पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महानगरपालिकाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार संध्याकाळी ७ ते ८ या कालावधीत २०८० वाहनांनी कोस्टल रोडच्या या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावरुन प्रवास केला. तर संध्याकाळी ५ ते ६ या तासाभरात १७७० वाहनांनी प्रवास केला. आणि ६ ते ७ या वेळेत १,६५० वाहनांची नोंद झाली.
याआधी मार्च महिन्यात कोस्टल रोडचा वरळी ते मरीन ड्राइव्ह असा पहिला टप्पा सुरू केला गेला. त्यावेळी पहिल्याच दिवशी १६३३१ वाहनांनी यामार्गावरुन प्रवास केला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जुलै अखेरपर्यंत मरीन ड्राइव्ह आणि वांद्रे वरळी सी लिंक दरम्यानचा मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होईल. आता कोस्टल रोडच्या दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही बाजूकडील मार्गिका फेजमध्ये खुल्या करण्यात आल्या आहेत. १३,००० कोटी रुपये खर्चून बांधलेला १०.५८ किमी लांबीचा मुंबई कोस्टल रोड हा एक 'हाय स्पीड कॉरिडॉर' आहे ज्यामध्ये बोगदे, वाहनांचे इंटरचेंज आणि पूल यांचा समावेश आहे.