२६ हजारांहून अधिक मुंबईकरांकडे कुत्रा पाळण्याचे परवाने; प्रक्रिया काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 12:08 PM2023-05-04T12:08:32+5:302023-05-04T12:08:50+5:30
परवान्यासाठी पुढे येण्याचे पालिकेने केले आवाहन, प्रक्रिया ऑनलाइन
मुंबई - अनेक मुंबईकर आपल्या घरी कुत्रा, मांजर पाळत असले तरी अनेकांना अद्यापही या संदर्भात पालिकेकडून याचा अधिकृत परवाना घेणे आवश्यक आहे याचीच माहिती नसल्याचे समोर आले आहे.
कुत्रा पाळण्यासाठीचा हा परवाना मुंबई महापालिकेकडून बंधनकारक नाही किंवा त्यामुळे दंड होणार नसला तरी तो अत्यावश्यक आहे कारण यामुळे संबंधित नोंद पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे होत असून कुत्र्याच्या वेळोवेळी केल्या जाणाऱ्या लसीकरणाची माहिती अद्ययावत केली जाते. यामुळे पाळीव कुत्र्याच्या आरोग्याची तर दखल घेतली जातेच पण तो ज्या कुटुंबात वावर करतात तेथे त्यामुळे काही आजार उद्भवणार नाही याची ही काळजी घेतली जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून घरी कुत्रा पाळणाऱ्यांनी त्यांची नोंदणी करावी, लसीकरण करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबईत फक्त २६ हजार ९७८ पाळीव कुत्र्यांची नोंदणी झाली आहे.
परवाना आवश्यक का?
पाळीव कुत्री पाळणाऱ्या व्यक्तीने कुत्र्याचे पिल्लू लहान असतानाच त्याचे लसीकरण केले पाहिजे कारण, पाळीव कुत्र्यांपासून सर्वाधिक धोका कुत्री पाळणाऱ्या कुटुंबाला होऊ शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने होऊ शकणार आहे.
प्रक्रिया काय ?
मुंबई पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने कुत्रा पाळण्यासाठी आवश्यक परवान्यासाठी अर्ज दाखल करता येतो. कुत्र्याच्या वयाप्रमाणे त्यासाठी प्रतिवर्ष १० रुपयांप्रमाणे ऑनलाइन शुल्क भरावे लागते आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. हा परवाना दर एका वर्षाने नूतनीकरण आवश्यक असते. ऑनलाइन प्रक्रियेमुळे परवाना हा घरपोच मिळण्याची सोय पालिकेकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिकाधिक मुंबईकरांनी या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.