मुंबई :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा मुंबई महापालिकेकडून यंदा १ ऑगस्टपासून उपलब्ध करण्यात आली आहे. रविवारपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील तब्बल तीन हजार १०० मंडळांना पालिकेकडून परवानगी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.
दरम्यान, अजूनही काही मंडळे परवानगीच्या प्रक्रियेमध्ये असून सोमवारपर्यंत त्यांच्या परवानग्या अंतिम होतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेकडे यंदा मंडप परवानगीसाठी तब्बल ३ हजार ७०० मंडळांनी अर्ज केले आहेत. मुंबई पालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून ही सुविधा सुरू करण्यात आली. या सुविधेमुळे गणेश मंडळांना पोलिस, वाहतूक पोलिस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही.
1. मंडपांसाठी मंडळांना परवानगीकरिता शुल्क भरणे आवश्यक नाही. मंडप परवानगी नि:शुल्क आहे; तर १०० रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. 2. आत्तापर्यंत याबाबतचे ३ हजार ७०० अर्ज मुंबई महापालिकेकडे आले होते. यांपैकी ३ हजार १०० परवानग्या देण्यात आल्या 3. ५०० अर्ज नाकारण्यात आले, अशी माहिती उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली.
मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, शिवाय काही अटींची पूर्तता या मंडळांनी केली नसल्याचे लक्षात आल्यावर वाहतूक पोलिस किंवा इतर काही प्राधिकरणांकडून ही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यानंतर पालिकेनेही हे अर्ज नाकारले, असे बिरादार यांनी सांगितले.
कृत्रिम तलावांची संख्या वाढणार?घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेल्या वर्षी १५४ कृत्रिम तलाव होते. यंदा ते ३०८ केले जाणार आहेत. मात्र त्यापेक्षाही जास्त कृत्रिम तलाव तयार होऊ शकतात का, याची चाचपणी पालिकेकडून केली जात आहे. त्यानुसार वॉर्डस्तरावर याचा आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
३ हजार ७०० पालिकेकडे गणपती मंडळांचे एकूण अर्ज - ३ हजार १०० आतापर्यंत मिळालेल्या परवानग्या ५०० नाकारलेल्या परवानग्या - जवळपास