मुंबईत दिवसभरात ३ हजारांहून अधिक रुग्ण, ६९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:07 AM2021-05-07T04:07:26+5:302021-05-07T04:07:26+5:30
आतापर्यंत ६ लाखांहून अधिक कोरोनामुक्त लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. बाधित रुग्णांपेक्षा ...
आतापर्यंत ६ लाखांहून अधिक कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईत गुरुवारी ३ हजार ५६ नव्या रुग्णांची मुंबईत नोंद करण्यात आली. काल ही संख्या ३ हजार ८७९ इतका होती. असे असले तरी मुंबईत दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
मागील २४ तासांत ३ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख हजार ३८३ इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर आहे. सध्या मुंबईत ५० हजार ६०६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
२९ एप्रिल ते ५ मेपर्यंतचा मुंबईचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.५१ टक्का इतका आहे, तर मुंबईत दिवसभरात ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत ३० हजार ९४२ दैनंदिन कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत कंटेन्मेंट झोनमध्येही घट झाली. मुंबईत सध्या ९६ सक्रिय कंटेन्मेंट झोन आहे, तर ६४५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २४ हजार ७२७ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.