मुंबईतील सहा जम्बो रुग्णालयांमध्ये वर्षभरात ८९ हजारांवर रुग्णांवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 08:57 PM2021-06-05T20:57:28+5:302021-06-05T21:38:09+5:30
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या मध्ये वाढ होत गेल्याने खाटांची कमतरता जाणवत होती.
मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता नियंत्रणात आला आहे. मात्र गेल्या वर्षभरात महापालिकेचे सहा जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये तब्बल ८९ हजार २०६ रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. यासाठी एक हजार १५७ डॉक्टर्स, एक हजार १३७ परिचारिका, एक हजार १८० वॉर्डबॉय असे चार हजार ६५८ इतके मनुष्यबळ कार्यरत आहे. तर आठ हजार ९१५ खाटा आहेत.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या मध्ये वाढ होत गेल्याने खाटांची कमतरता जाणवत होती. अशावेळी 'जम्बो कोविड रुग्णालय' उभारण्याचा निर्णय घेतला. पहिले रुग्णालय वरळी परिसरातील राष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये (एन.एस.सी.आय.) कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगाव, भायखळा, मुलुंड आणि दहिसर या ठिकाणी देखील जम्बो केंद्रे उभारण्यात आली.
अशी आहेत जम्बो केंद्रे...
वरळी - येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या आवारात मुंबईतील पहिले 'जम्बो कोविड रुग्णालय' २१ एप्रिल २०२० रोजी तयार झाले. या ५९७ खाटांच्या रुग्णालयात नऊ हजार ८१ रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले. या रुग्णालयात कोविड होऊन गेलेल्या रुग्णांसाठी 'रिहॅबिलिटेशन केंद्र' देखील कार्यरत आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे अल्पावधीत व विक्रमी वेळेत उभारण्यात आलेल्या जंबो केंद्रात दोन हजार ३२८ खाटा असून आतापर्यंत २४ हजार १४९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. ६७ व्हेंटिलेटर, १०८ आय.सी.यू. आणि ८९६ ऑक्सिजन खाटांचा येथे समावेश आहे.
गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्राच्या आवारातील जम्बो केंद्रात दोन हजार २२१ खाटा असून वर्षभरात २१ हजार ६३७ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
भायखळा, रिचर्डसन आणि क्रूडास या केंद्र जम्बो केंद्रात एक हजार खाटा असून ११ हजार २६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
मुलुंडच्या एक हजार ७०८ खाटांच्या या रुग्णालयात १२ हजार ९२७ रुग्ण तर दहिसर केंद्रातील एक हजार ६१ खाटा असून १० हजार १५१ रुग्णांवर उपचार करण्यात आले.